scorecardresearch

धक्कादायक! कुत्रीसह पिल्लाची झाडाला लटकवून हत्या; उल्हासनगरमधील घटनेनंतर संताप आणि खळबळ

गेल्या काही दिवसातील तिसरी घटना; प्राणीमित्रांच्या प्रयत्नाने गुन्हा दाखल

प्रातिनिधिक फोटो

उल्हासनगरमध्ये एका कुत्रीसह तिच्या पिल्लाला झाडाला लटकावून फाशी देण्यात आल्याचा निर्दयी आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. प्राणीमित्रांनी हा प्रकार समोर आणल्यानंतर याप्रकरणी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

उल्हासनगरच्या कॅम्प ५ मधील साईनाथ कॉलनी परिसरात बुधवारी १६ मार्च रोजी रात्री एका कुत्रीला आणि तिच्या पिल्लाला गळफास देऊन झाडाला लटकवण्यात आल्याची माहिती पीपल फॉर अनिमल संस्थेच्या प्राणीमित्र सृष्टी चुग यांना फोनद्वारे समजली. त्यानुसार त्यांनी या ठिकाणी धाव घेत प्रकाराची माहिती घेतली. त्या ठिकाणी एक कुत्री आणि तिचे लहान पिल्लू मृतावस्थेत आढळून आले. त्यामुळे त्यांनी तातडीने दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले. या प्रकरणी त्यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार हिललाईन पोलिसांनी प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमान्वये अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

या कुत्रीला आणि तिच्या लहान पिल्लाला निर्दयतेने आणि क्रूरतेने कुणी मारले याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या घटनेने प्राणीमित्रांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. उल्हासनगर शहरात गेल्या काही दिवसात झालेली ही तिसरी घटना आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A dog and puppy killed by hanging to tree in ulhasnagar sgy

ताज्या बातम्या