डोंबिवली: येथील पलावा वसाहती मधील निर्माणाधिन असलेल्या एका १९ माळ्याच्या इमारतीला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले. आगीत इमारतीच्या पाचव्या माळ्यापासून ते गच्चीपर्यंतचे माळे जळून खाक झाले. आगीत जीवित हानी झाली नाही.
पलावा टप्पा दोन येथे टाटा ओरोलिया इमारतीच्या यांत्रिक सामान असलेल्या तळगृहात (डक्ट) अचानक आग लागली. वाऱ्याच्या वेगाने आगीने रौद्ररूप धारण करून आग यांत्रिकी जाळे असलेल्या दिशेने वरच्या माळ्यांपर्यंत पसरत गेली. पलावा वसाहतीमधील दोन अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीने आगीवर पाण्याचे फवारे मारून आग विझविण्यास सुरूवात केली. ही वाहने सात ते आठ माळ्यापर्यंतची आग विझू शकले. त्यानंंतर पर्यायी यंत्रणेचा वापर करून जवानांनी इमारतीच्या वरच्या भागापर्यंत गेलेली आग एक तासाच्या अथक प्रयत्नाने विझवली. आग लागल्यानंतर खोणी पलावा वसाहती मधील इतर रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते.
पलावा वसाहतीत आग लागली तर टोलेजंग इमारतींच्या मजल्यांवरील आग विझविताना अग्निशमन जवानांना तेवढ्या उंचीची यंत्रणा उपलब्ध नसल्याने अग्निशमन जवानांंना पर्यायी यंत्रणेचा वापर करून आग विझवावी लागते, असे रहिवाशांंनी सांगितलेे. तर पलावा अग्निशमन केंद्रातील जवानांनी आग विझविताना सर्व साधनांचा वापर करून आग विझवली आहे. आगीत कोणतीही जीवित हानी झालेली नाही, असे सांगितले.
आग लागल्यानंतर काटई-बदलापूर छेद रस्त्यावरील खोणी-तळोजा रस्त्यावरील वाहन चालक, प्रवासी आगीचे रौद्ररूप पाहण्यासाठी रस्त्याच्या कडेला वाहने घेऊन थांबले होते. दूर अंतरावरून ही आग दिसत होती. शहराच्या एका बाजुला आग लागलेली इमारत असल्याने वाऱ्याच्या वेगाने इमारतीमधील आगीने वेगाने पेट घेतला. तळगृहातील यांंत्रिकी यंत्रणेत बिघाड झाल्यानेच आग लागण्याची प्राथमिक शक्यता जवानांनी व्यक्त केली.