scorecardresearch

ठाण्यात इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागली आग

ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने केली दहा रहिवाशांची सुटका

ठाण्यात इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागली आग
ठाण्यात इमारतीच्या १८ व्या मजल्यावर लागली आग

येथील घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नलजवळील हिरानंदानी-१ पार्क येथील प्रिस्टन या इमारतीच्या १८ व्या मजल्यावरील एका बंद घरामध्ये बुधवारी दुपारी आग लागली होती. या घटनेनंतर या मजल्यावरील दहा रहिवाशांची ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने सुटका केली असून या घटनेत कुणीही जखमी झालेले नाही. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

हेही वाचा >>>बनावट परवानग्यांद्वारे ‘रेरा’ प्रमाणपत्र मिळविल्याबद्दल डोंबिवलीतील ३८ भूमाफियांवर फौजदारी गुन्हे दाखल

ठाणे येथील घोडबंदर भागातील ब्रम्हांड सिग्नलजवळ हिरानंदानी-१ पार्क येथे प्रिस्टन ही २७ मजली इमारत आहे. या इमारतीमधील १८ व्या मजल्यावरील १८०२ या सदनिकेत आग लागली होती. या घरातील कुटूंब काही कामानिमित्त बाहेर गेले होते. घरात कुणीही नव्हते, त्यावेळेस घरात आग लागली. घरातून धूर बाहेर येऊ लागल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. या घटनेची माहिती शेजाऱ्यांकडून मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि बाळकुम अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.

हेही वाचा >>> कल्याण पंचायत समितीच्या सभापती पदी अस्मिता जाधव

आगीमुळे मजल्यावर सर्वत्र धुर पसरला होता. त्याचा नागरिकांना त्रास होण्याची शक्यता होती. तसेच घरातील आग इतरत्र पसरली तर मोठी दुर्घटना घडण्याची भितीही व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाने या मजल्यावरील दहा रहिवाशांची सुटका केली. त्याचदरम्यान अग्निशमन दलाच्या जवानांनी घरातील आग विझविण्याचे काम सुरु केले होते. एका तासांच्या अवधीनंतर ही आग पुर्णपणे विझविण्यात जवानांना यश आले. आगीमुळे घरातील साहित्य जळून खाक झाले आहे, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या