केंद्रीय संस्थांची बनावट कागदपत्र तयार करून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सहा जणांच्या टोळीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली.
अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणारा दुर्मिळ धातू आंतरराष्ट्रीय कंपनीस ३ हजार कोटी रुपयांना विक्री केला आहे. हे पैसे रिझर्व्ह बँकेच्या मंजूरी विभागात अडकल्याने त्यासाठी पैशांची गरज आहे. रिझर्व्ह बॅंकेकडून पैसे मिळाल्यानंतर मदत केलेल्या रकमेपेक्षा जास्त पैसे देऊ, अशी बतावणी करून ही टोळी नागरिकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक करीत होती, अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. नागरिकांचा विश्वास बसावा म्हणून आरोपींनी रिझर्व्ह बँक, भारतीय अंतराळ संशोधन केंद्र (इस्त्रो), भाभा अनुसंशोधन केंद्र, भारतीय पुरातत्त्व विभाग, संरक्षण मंत्रालय यांसारख्या विभागाची बनावट कागदपत्रे तयार केली होती. आरोपींनी किती जणांची फसवणूक केली आहे. याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
मल्लपा चंद्र अलगुर (३६), दयानंद कृश्णप्पा बंगेरा (४९) महेंद्र महादेव नायक (२५) रविकुमार निलकंठ जोईल (३८), सुमंत जयराम वैझे (२४) आणि शांताबाई आचार्य (४१) अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत.
चौकशीनंतर गुन्ह्याची कबूली दिली –
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांची फसवणूक करणारी टोळी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून सहाही जणांना ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केली असता, त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. याप्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
