A global conference lines Davos will be held Mumbai next year Industry Minister Uday Samant information ysh 95 | Loksatta

मुंबईत जागतिक स्तरावरील परिषद होणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती; म्हणाले, “दावोसप्रमाणेच आता मुंबईतही…”

जगात आणि देशात मुंबईचे नाव खूप मोठे असून या शहरात दावोसच्या धर्तीवर जागतिकस्तरावरील परिषद घेण्याचा आमचा मानस आहे.

मुंबईत जागतिक स्तरावरील परिषद होणार, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती; म्हणाले, “दावोसप्रमाणेच आता मुंबईतही…”
उदय सामंत संग्रहित छायाचित्र

ठाणे : जगात आणि देशात मुंबईचे नाव खूप मोठे असून या शहरात दावोसच्या धर्तीवर जागतिकस्तरावरील परिषद घेण्याचा आमचा मानस आहे. पुढच्या वर्षीपासून या परिषदेला आम्ही सुरुवात करणार आहे. यामुळे दावोसला जसे उद्योगांचे करार करण्यासाठी जातात, तसे मुंबईतही करार करण्यासाठी लोक येतील, अशी माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना दिली. उद्योजकांना भेटणारे मंत्री मिळावेत म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असे सांगत त्यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. उद्योग जगताला बदनाम करुन मतांसाठी वारंवार राजकारण केले जात असेल तर ते नवीन उद्योगांसाठी घातक असल्याचे मत व्यक्त करत त्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर निशाणा साधला.

हेही वाचा >>> मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधेचा आणखी विस्तार; आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले संकेत

ठाणे येथील टीप टॉप प्लाझा सभागृहामध्ये लक्षवेध संस्थेच्यावतीने बिझनेस जत्रा २०२२ चे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला उद्योग मंत्री उदय सामंत, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, कोसिआचे सचिव निनाद जयवंत यांच्यासह उद्योग मोठ्या संख्येने होते. या बिझनेस जत्रा २०२२ च्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. दावोस परिषदेच्या पार्श्वभूमीवर आम्ही दर पंधरा दिवसांनी बैठक घेण्याचे ठरविले आहे. कारण आम्हाला शाश्वत विकास करायचा असून केवळ प्रसिद्धीसाठी काम करायचे नाही. असे काम केले तर कधी ना कधी आम्ही उघडे पडू असे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाहीत विकासासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उदयोग मंत्री अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. परंतु या पदाचा उन्माद किंवा माज असता कामा नये.

हेही वाचा >>> कळवा नवीन खाडी पुलासह शीळ उड्डाणपुलाच्या लोकार्पणास मुहूर्त मिळला

या व्यवस्थेमध्ये कोणीही ताम्रपट घेऊन आलेला नाही. मागील अडीच वर्षात हे जाणवलेच आहे, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडीवर टिका केली. आपल्याला मिळालेल्या पदाचा कालावधीत जनतेची कामे करायला हवीत. त्यासाठी जनतेला भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्यायला हव्यात, असे सांगत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. उद्योजकांना भेटणारे मंत्री मिळावेत म्हणून आम्ही गुवाहाटीला गेलो होतो, असे सांगत त्यांनी माजी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यावर अप्रत्यक्षपणे टिका केली. महाराष्ट्राच्या विकासासाठी, उद्योजकांना एक वेगळी ताकद देण्यासाठी आम्हाला गुहाटीला जावे लागले असा दावाही त्यांनी यावेळी केला. राज्यातील विभागांना राजाश्रय नसेल तर त्या विभागांची वाटचाल चांगली होत नाही. त्यामुळे मंत्री झाल्यानंतर उद्योग विभागाला राजाश्रय देण्याचा प्रयत्न केला. उद्योग प्रोत्साहन अनुदान जेंव्हा आम्ही देतो, तेव्हा फार मेहरबानी करत नाही, मात्र हे अनुदान अडीच वर्षे तिजोरीत का राहिले, याबाबत मला काही बोलायचे नाही, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. पुढील मार्च अखेरर्पयत सर्व उद्योग प्रोत्साहन अनुदान दिले जातील अशी ग्वाही त्यांनी दिली. उद्योग गेले म्हणून आम्ही आरडाओरड करतो. मात्र महाराष्ट्रात जे उद्योग सुरु आहेत, त्यांना मोठे केले जात नाही, असेही ते म्हणाले. उद्योग घालवले म्हणून तुम्ही आमच्यावर टिका आणि आरोप करू शकता पण, त्याचा परिणाम केवळ शिंदे-फडणवीस सरकारवर होणार नाही तर, भविष्यात बाहेरून राज्यात येणारे उद्योग थांबून राज्याचे नुकसान होईल, अशी भितीही त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी राजकारण करावे असा निर्णय सर्वांनी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने डोंबिवलीत रविवारी किलबिल महोत्सव

राज्य सरकारकडून उद्योजकांना मिळणाऱ्या प्रोत्साहन अनुदानासाठी कट द्यावा लागत असून तो उद्योजकांना देणे शक्य नसल्यामुळे गेले दोन वर्षे उद्योजकांना प्रोत्साहन अनुदान मिळू शकले नव्हते, असा गंभीर आरोप महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कोमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी महाविकास आघाडी सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे. आता नवे सरकार आल्यानंतर परिस्थिती बदलली असून कोणत्याही ‘वजना’ शिवाय उद्योजकांनाच्या अनुदान जमा झाले असल्याचे सांगत त्यांनी शिंदे आणि फडणवीस सरकारचे कौतुक केले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-11-2022 at 18:10 IST
Next Story
मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे रूग्णालयात रुग्ण सुविधेचा आणखी विस्तार; आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहाणी दौऱ्यादरम्यान दिले संकेत