घरकाम करणाऱ्या एका महिलेने घरातील साफ सफाई करता करता तब्बल १३ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी उल्हासगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिलाही याच भागात राहत असून पोलीस तपास करत आहेत.

उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात कैलाश भिषमदास मोहानी अमित मेहेल येथे वास्तव्यास आहेत. फरशीचे व्यापारी असलेले मोहानी यांच्या घरात घरकाम करण्यासाठी सुरैशा जाधव (३०) ही महिला नियमितपणे येत होती. १६ ऑगस्ट रोजी मोहानी यांच्या घरातील बेडरूममध्ये कपाटातील एका खान्यात ठेवलेली १३ लाख रूपयांची रोकड गायब झाल्याचे दिसले. ही रोकड घरकाम करणाऱ्या सुरेखा जाधव यांची चोरल्याचा त्यांना संशय आला. त्यामुळे मोहानी यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सुरेखा जाधव या महिलेवर १३ लाख रूपयांची रोकड लबाडीने चोरून नेल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. ही आरोपी महिला उल्हासनगरच्या याच कॅम्प पाच भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे.