ठाणे : शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाने गोठवल्यानंतर आणि शिवसेनेतील फुटीचे केंद्रबिंदू असलेल्या ठाणे शहरातुन रविवारी महाप्रबोधन यात्रेला ठाकरे गटाने सुरुवात केली असून या यात्रेच्या निमित्ताने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. गद्दारांनी नाव आणि चिन्ह गोठवले पण, खुद्दारांनी रक्त पेटवले, अशा घोषणा नेत्यांसह शिवसैनिकांनी दिल्या.

हेही वाचा >>> “ज्यांनी पक्षावर ही वेळ आणली ती रावणाची औलाद”, शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांची शिंदे गटावर टीका

हेही वाचा >>> ठाणे : टक्केवारीतून आणि देणग्या देऊन देवपण येत नाही; धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टिका

रविवारी सायंकाळी वाजत गाजत शिवसैनिकांचे जथे गडकरी रंगायतनमध्ये दाखल होत होते. गडकरी रंगायतनचे  सभागृह भरले होते. त्यामुळे रंगायतनच्या आवारात लावलेल्या स्क्रीनवर अनेक शिवसैनिकांनी भाषण ऐकली. या यात्रेत बोलताना शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी महाप्रबोधन यात्रा काढण्यामागचे कारण स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने अनेक आश्वासने दिली होती. त्याचे पुढे काय झाले, याचे प्रबोधन करण्यासाठी ही यात्रा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मन की नव्हे तर जन की बात ऐकविण्यासाठी ही यात्रा असल्याचेही त्या म्हणाल्या. त्यांनी चिन्ह, नाव गोठविण्याचा प्रयत्न केला. पण ते आमच स्पिरीट गोठवू शकत नाही. जिद्द आणि लढण्याची ताकद गोठवू शकत नाही. कारण जनता आमच्या सोबत आहे, असेही त्या म्हणाल्या.

हेही वाचा >>> “…आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळेच मुंबई महाराष्ट्रात” ऋता आव्हाड यांचे विधान

 ज्यांनी पक्षावर ही वेळ आली आणि ती रावणाची औलाद असा उल्लेख करत  शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे यांनी शिंदे गटावर टीका केली. शिवसेनेचा जन्म संघर्षातून झालाय. आता गप्प बसणार नाही. दसऱ्याला १० तोंडाचा रावण जाळला. आता ४० तोंडाचा रावण जाळायचा आहे. त्यासाठी आम्ही तयार आहोत. चिन्ह कुठलेही असो आम्हीच निवडणूका जिंकू असेही त्या म्हणाल्या. आम्ही २००४ मध्ये मोठी चुक केली आणि आता ती सुधारण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कोपरी पाचपखाडी आणि ओवळा माजीवडा मतदार संघात आनंद दिघे यांच्या सच्चा शिवसैनिकांना निवडून आणण्याचा निर्धार करा, असे आवाहन शिवसेना नेते विनायक राऊत यांनी यावेळी केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नादाला लागून शिवसेनेला कोर्टात नेले आणि शिवसेना संपविण्याचे पातक केले. एक दिवस तुम्हाला पश्चाताप करावा लागेल. भाजपने शिवसेना संपविण्याचा प्रयत्न केला. पण त्यात यश आले नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर करून भाजपने हा डाव साधला आहे.  ही फक्त त्यांच्या हातातील प्यादी आहेत,असा आरोप शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केला.