पतीच्या जाचाला कंटाळून पत्नीने आत्महत्या केल्याचा प्रकार कल्याणमधील मिलिंदनगर भागात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाखा विलास मोहपे (रा. मिलिंदनगर, कल्याण पश्चिम) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर विलास पांडुरंग मोहपे (२६, रा. उमरोली, ता. मुरबाड) असे आरोपी पतीचे नाव आहे. विशाखाचे वडील दिनकर आभाळे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात विलासविरोधात पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
हेही वाचा- डोंबिवलीत कचरा वेचणाऱ्या महिलेचा मंगळसूत्रावर डल्ला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर आभाळे यांची मुलगी विशाखाने हिने घरातून पळून जाऊन २०१७ मध्ये विलास मोहपे याच्या बरोबर आळंदी येथे जाऊन नोंदणी पध्दतीने विवाह केला होता. शेतकरी कुटुंबातील दिनकर यांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. ती आढळून आली नाही. मुरबाड जवळील टोकावडे पोलीस ठाण्यातून एक दिवस दिनकर यांना संपर्क करण्यात आला. तुमच्या मुलीने विवाह केला असून ती विवाह नोंदणीसाठी पोलीस ठाण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. त्यानंतर आभाळे कुटुंबीयांना मुलीने विवाह केला आहे असे समजले.
हेही वाचा- कोपर-भिवंडी रेल्वे मार्गात आढळला तरुण-तरुणीचा मृतदेह; अपघात की आत्महत्या, तपास सुरु
त्यानंतर मुलगी विशाखाने विवाहानंतर आपल्या अकलापूर येथील आई-वडिलांच्या घरी येणेजाणे सुरू केले. तिने आईला पती विलास हा मद्यपान करुन मारहाण करत असल्याचे सांगितले. दोन वेळा जबरदस्तीने विलासने तिचा गर्भपात करुन घेतला होता. पतीच्या त्रासाला कंटाळून विशाखाने एकदा विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात ती थोडक्यात बचावली होती.
हेही वाचा- भिवंडी: दुसऱ्या मजल्यावरून पडून एकाचा मृत्यू
पती विलासकडून खूपच त्रास होऊ लागल्याने विशाखाने गेल्या महिन्यात रागाने माहेरी निघून गेली होती. पंधरा दिवस ती तेथे होती. विलासनेही तिला तुझी मला गरज नाही. परत तू येऊ नकोस असे सांगितले होते. एक दिवस विलासने विशाखाला संपर्क करुन झाले गेले विसरुन जा आपण सुखाने राहू असा निरोप दिला. त्यामुळे विलासच्या वडिलांनी तिला पुन्हा कल्याणला पाठविली होती. दोन दिवसांनी पुन्हा विलासने विशाखाला त्रास देणे सुरू केले. हा त्रास कमी होणार नसल्याने पतीच्या त्रासाला कंटाळून विशाखाने २८ ऑक्टोबर रोजी घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशाखाच्या वडिलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात पती विलास वर आरोप करत तोच विशाखाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.
