ठाणे : दूधासाठी मासिक ४९९ रुपयांची सदस्यता भरण्यास सांगून एका व्यक्तीची ३० हजार ४९० रुपयांना ऑनलाईन फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
फसवणूक झालेला व्यक्ती कोलशेत भागात वास्तव्यास आहे. ते नेहमी त्यांच्या क्रेडीट कार्डने ऑनलाईन खरेदी करतात. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या मोबाईलवर ४९९ रुपयांच्या सदस्यतेवर एक महिना दूध मिळेल अशी जाहिरात आली होती. ही सदस्यता घेण्यास तक्रारदार इच्छूक असल्याने त्यांनी क्रेडीट कार्डच्या माध्यमातून ४९९ रुपयांचे व्यवहार करण्यास सुरूवात केली. त्यांनी व्यवहार करताच, क्रेडीट कार्डमधून ३० हजार ४९० रुपयांचा व्यवहार झाला. त्यानंतर त्यांनी संबंधित संकेतस्थळ, त्यांच्या बँकेला व्यवहार थांबविण्याबाबत ई-मेल केला. त्यानंतर बँकेने हा व्यवहार कोणाच्या खात्यात झाला. याबाबतची माहिती तक्रारदार यांना मिळाली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईनरित्या सायबर संकेतस्थळावर तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गेल्याकाही दिवसांपासून ऑनलाईनरित्या फसवणूकीचे प्रकरणे दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे.