कल्याण – कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील टाटा पाॅवर नाका येथील पिसवली गाव हद्दीत बुधवारी एका पोतळीमध्ये भरलेली हजारो मतदारांची ओळखपत्रे रस्त्यावर फेकलेली आढळून आली आहेत. बहुतांशी मतदार ओळखपत्रे कल्याण पूर्व भागातील नेतिवली, पिसवली, चक्कीनाका भागातील रहिवाशांंची असल्याचे समजते.

मानपाडा पोलिसांनी ही ओळखपत्रे ताब्यात घेऊन या मतदान ओळखपत्रांची सत्यता, ही ओळखपत्रे रस्त्यावर कोणी आणून फेकली. अलीकडे पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदार ओळखपत्रांचा वापर झाला आहे का या दिशेने तपास सुरू केला आहे. कल्याण पूर्वेतील कल्याण-शिळफाटा रस्त्याजवळील पिसवली गावाच्या प्रवेशव्दारावरील कमानीजवळ एक वस्तूने भरलेली पिशवी बुधवारी पडली असल्याचे नागरिकांना दिसले. सुरुवातीला शिळफाटा रस्त्यावरून धावणाऱ्या एखाद्या वाहनातून ही पिशवी पडली असल्याचे पादचाऱ्यांना वाटले. परंतु, एका पादचाऱ्याने या पिशवीत काय आहे हे पाहण्यासाठी ती पिशवी उघडली. त्यामध्ये निवडणूक मतदान ओळखपत्रे दिसली. ही ओळखपत्रे फेकण्यात काहीतरी गडबड दिसते, त्यामुळे संबंधित पादचारी तेथून निघून गेला.

हेही वाचा – ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचले

आताच निवडणुका पार पडल्या आहेत. ही मतदान ओळखपत्रे बनावट निघाली तर आपल्याला नाहक चौकशीला सामोरे जावे लागेल, या भीतीने कोणीही नागरिक या मतदान ओळखपत्रांच्या पिशवीजवळ गेला नाही. काही नागरिकांनी ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी रस्त्यावर पडलेली ओळखपत्रे जमा केली. ती पोतडीसह जप्त केली. या पोतडीवरील शिक्क्याच्या अनुषंगाने पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

हेही वाचा – डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट पाचवर छत नसल्याने प्रवाशांची तारांबळ

कल्याण पूर्व भागातील बहुतांशी रहिवासी हा उत्तर भाषिक आहे. लोकसभा निवडणूक काळात हा वर्ग आपल्या मूळ राज्यात गेला होता. त्यामुळे मतदार असलेल्या या रहिवाशांच्या नावे बनावट मतदार ओळखपत्र तयार करून लोकसभा निवडणुकीत त्याचा वापर केला गेला आहे का, असा संशय जागरूक नागरिक, काही राजकीय मंडळींकडून व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करण्याची मागणी पुढे येत आहे.