scorecardresearch

डोंबिवलीत राजकीय रण पेटले; मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप

मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात बोलू लागल्याने माशी शिंकली कुठे अशी चर्चा सुरू राजकीय मंडळींमध्ये सुरू झाली आहे.

डोंबिवलीत राजकीय रण पेटले; मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात आरोप-प्रत्यारोप
मंत्री रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

डोंबिवली- सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रविवारी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रस्ते, खड्डे, कल्याण डोंबिवली पालिकेतील आयुक्तांच्या मनमानीवरुन नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांना लक्ष्य केले. ही टीका जिव्हारी लागल्याने सोमवारी शिंदे समर्थक कल्याण डोंबिवली पालिकेतील माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंत्री चव्हाण यांना टीकेचे लक्ष्य केल्याने डोंबिवलीत राजकीय रण पेटले आहे. ही धग मंत्रालयापर्यंत पोहचल्याची जोरदार चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्तानाट्यात मंत्री चव्हाण यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. तेच आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात बोलू लागल्याने माशी शिंकली कुठे अशी चर्चा सुरू राजकीय मंडळींमध्ये सुरू झाली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : राज्यातील महिला रामदास कदमांची जोड्याने पूजा करतील- भास्कर जाधव

हेही वाचा >>> CM शिंदेंच्या घरासमोरील महामार्गावरील खड्डे बुजवण्यासंदर्भात अजित पवारांचं मुख्यमंत्र्यांनाच पत्र; म्हणाले, “नागरिक आपला…”

डोंबिवलीतील ब्लाॅसम शाळेच्या प्रेक्षागृह उद्घाटन कार्यक्रमात जनरल एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष डाॅ. उल्हास कोल्हटकर यांनी डोंबिवली परिसरातील रस्ते सुस्थितीत करण्याचा विषय उपस्थित केला. हा धाग पकडून मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अडीच वर्षापूर्वी डोंबिवली शहर परिसरातील रस्ते कामांसाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करुन मंजूर केलेला ४७२ कोटीचा निधी. सरकार बदलून महाविकास आघाडी सरकार येताच नगरविकास विभागाने निधी कसा रद्द केला. कडोंमपा हद्दीत सहा वर्षापासून सुरू असलेला माणकोली पूल, आठ वर्षापासून सुरू असलेले शिळफाटा रस्ते काम या विषयावरुन मविआ सरकारला आणि अप्रत्यक्षपणे नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खा. शिंदे यांना लक्ष्य केले.

हेही वाचा >>> रेटींग देण्याचे काम पडले महागात; आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याची २७ लाख रूपयांना फसवणूक

रस्ते विषय हा सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए, एमएमआरडीसी, पालिका अशा विभागांमध्ये विभागला आहे. डोंबिवली खड्डयांचा विषय आला की फक्त आमदार चव्हाण यांचा मतदारसंघ म्हणून मला कलाकारांपासून सर्वजण समाज माध्यमात झोडपतात. ही टीका करण्यापूर्वी टीकाकारांनी मी अडीच वर्षापूर्वी ४७२ कोटीचा काँक्रिट रस्ते कामासाठी डोंबिवली परिसरासाठी निधी आणला होता. या निधीतून कामे सुरू होताच, राज्यात मविआ सरकार आले. आपण मंजूर केलेल्या निधी प्रस्तावावर स्वच्छ हस्ताक्षरात हा प्रस्ताव रद्द करण्यात येत आहे, असे लिहिण्यात आले. हा निधी मिळावा म्हणून अडीच वर्ष आपण संघर्ष केला. कोणाला तरी दुर्बुध्दी सुचली आणि हा निधी मिळणारच नाही यासाठी आपल्याशी नाही तर डोंबिवली परिसरातील लोकांशी काही मंडळींनी खेळ केला. आता त्या निधीतून रस्ते झाले असते तर खड्ड्यांचा विषय चर्चेला आला नसता, असे मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा >>> ठाण्यातील विद्यार्थ्यांनी घेतले वारली चित्रकलेचे प्रशिक्षण;  समता विचार प्रसारक संस्थेचा अभिनव उपक्रम

पाप धुतले जाईल

४२२ कोटीचा निधी खुला करा. त्यातून कामे होऊन द्या असे सांगूनही आपले कोणी ऐकत नाही. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणारे कलाकार जयंत वाडकर, विजय पाटकर यांनी मुख्यमंत्र्यांना डोंबिवलीतील खड्डयांची परिस्थिती पाहून ४७२ कोटी रस्ते प्रस्तावावरील रद्दची टीपणी रद्द करुन तो निधी खुला करण्याची मागणी करावी. ज्यामुळे मागचे पाप धुऊन जाईल, अशी सूचना मंत्री चव्हाण यांनी केली. नगरविकास प्रधान सचिव भूषण गगराणी यांना विषय माहिती आहे पण त्यांचीही अडचण आहे, असे चव्हाण म्हणाले.

हेही वाचा >>> ठाणे शहरात बुधवारी पाणीपुरवठा नाही

जावई आयुक्त

कडोंमपा हद्दीतील रस्ते सुस्थितीत करणे, विकास प्रकल्प मार्गी लावणे आयुक्तांचे काम आहे. अडीच वर्षापासून कडोंमपामध्ये शासनाचे पालिकेत आयुक्त म्हणून येणारे अधिकारी पालिकेत नगरसेवक नसल्याने मनमानीने काम करत आहेत. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी नगरसेवक नाही. गाॅडफादर पाठीशी असल्याने ते डोक्यावर चढले आहेत. जावई सारखी त्यांना वागणूक दिली जात आहे. कडोंमपाचा कारभार रामभरोसे सुरू आहे. १५ कोटी खर्च करुन कडोंमपात हद्दीत खड्डे पडतात. तो पैसे गेला कुठे. विकास निधी रद्द करुन लोकांशी खेळ कोणी खेळू नये, असा टोला मंत्री चव्हाण यांनी शिंदे पिता-पुत्राला लगावला.

हेही वाचा >>> तीन वर्ष उलटुनही प्रतिनियुक्तीवरील शहर अभियंतांचा कल्याण-डोंबिवलीत मुक्काम

सुतिकागृह

डोंबिवलीत सुतिकागृहाच्या ठिकाणी डाॅ. कोल्हटकर यांच्या पुढाकाराने रोटरीतर्फे अद्ययावत रुग्णालय उभारण्यात येणार होते. या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधा शहरात उपलब्ध झाली असती. त्यात पाचर मारणाऱ्यांनी खोडा घातला अशी टीका चव्हाण यांनी केली. सहा वर्षापासून माणकोली पूल सुरू आहे. त्यासाठी निधी आणणे. ते काम वेळेतपूर्ण करण्यासाठी दमदार प्रशासकीय अधिकारी असावा लागतो. ठेकेदार इच्छाशक्ती असावी लागते ती दिसून येत नाही. आठ वर्षापासून शिळफाटा रस्त्याचे काम सुरू आहे. हे प्रकल्प संथगतीने करुन लोकांचा जीव किती दिवस काढला जाणार. हे सर्व प्रकल्प आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या अधिपत्त्याखाली आहेत अशी पुस्ती चव्हाण यांनी जोडली. ठाण्यात ९०० खाट्यांचे सुसज्ज रुग्णालय १५ महिन्यात उभे राहणार आहे. राज्य, राष्ट्र विकासाचा विचार केला तर नागरी हिताच्या आड राजकारण येता कामा नये. आक्रमकपणे काम केले तर आपणास बाहेर काढले जाईल किंवा पडावे लागेल असा गर्भित इशारा चव्हाण यांनी दिला.

हेही वाचा >>> लेटलतीफ पालिका कर्मचाऱ्यांचे गांधीगिरीने स्वागत; उल्हासनगर पालिका प्रशासनाकडून पुष्प देत करून दिली जाणीव

स्व:ताचे अपयश झाकण्यासाठी-समिती सभापती दीपेश म्हात्रे यांचा पलटवार

मागील तेरा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत रवींद्र चव्हाण यांना कोणतीही विकास कामे करता आली नाहीत. त्यांनी आश्वासन दिलेला एकही विकासाचा प्रकल्प आकाराला आला नाही. डोंबिवलीतील बकालपणावरुन आता टीका सुरू झाल्याने ते अपयश झाकण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य करत आहेत, अशी टीका कल्याण डोंबिवली पालिका स्थायी समितीचे माजी सभापती आणि खा. डाॅ. शिंदे समर्थक दीपेश म्हात्रे यांनी सोमवारी येथे केली. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील रखडलेले शिळफाटा, माणकोली उड्डाण पूल प्रकल्प, रस्त्यांवरील खड्डे विषयांवरुन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील एका कार्यक्रमात रविवारी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खा. डाॅ. श्रीकांत शिंदे यांचा नामोल्लेख टाळून खरमरीत टीका केली होती. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मंजूर झालेले ४७२ कोटीचा निधी नंतर आलेल्या मविआ सरकारमधील नगरविकास विभागाने अडवून ठेवला नसता तर आता डोंबिवली परिसरातील रस्ते सुस्थितीत असते असे विधान करुन कोणाला दुर्बधी सुचली आणि त्या प्रस्तावावर हे प्रस्ताव रद्द करण्यात येत आहेत, असे लिहिण्यात आले. ती टीपणी काढण्यासाठी आपण संघर्ष केला. आता आपण सांगून थकलोय त्यामुळे लोकांनीच त्यासाठीच पुढाकार घेण्याची गरज आहे असे मंत्री चव्हाण यांनी भाषणात सांगितले होते.

या विधानावरुन दीपेश म्हात्रे यांनी चव्हाण यांना लक्ष्य करताना गुवाहटीहून मुंबईत येताना तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत होता. त्यावेळी कानात बोलून डोंबिवलीतून विकास कामे करा म्हणून सांगायला पाहिजे होते. तेरा वर्षात आणि अडीच वर्षाच्या मंत्रिपद काळात चव्हाण यांनी कोणतीही विकासकामे डोंबिवलीत केली नाहीत. आता शहराला बकालपण आल्यानंतर त्यावरुन लोकांची नजर वळविण्यासाठी ते मुख्यमंत्री शिंदे, खा. शिंदे यांना लक्ष्य करत आहेत, असे म्हात्रे यांनी सांगितले. चव्हाण हे आता सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत. हे ते विसरले का, असा प्रश्न म्हात्रे यांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत डोंबिवलीतील दोन रस्ते आहेत. मानपाडा रस्ता आणि घरडा सर्कल ते पेंढरकर रस्ता. हे रस्ते मंत्री चव्हाण यांच्या विभागाच्या अंतर्गत असुनही त्या रस्त्यांची काय दुरवस्था आहे ती बघा. किमान ती कामे तरी सुरू करून लोकांना चांगला रस्ता द्या, अशी मागणी म्हात्रे यांनी केली. गेल्या दोन वर्षापासून मंत्री चव्हाण ज्या ४०० कोटी रस्ते निधीचा उल्लेख करतात. ते रस्ते कधी मंजूरच झाले नव्हते, अशी पुष्टी म्हात्रे यांनी जोडली. गेल्या अडीच वर्षापासून चव्हाण आणि शिंदे पिता-पुत्रांच्या मध्ये रस्ते निधीवरुन कलगीतुरा सुरू आहे. तो आता सत्तेत एकत्र असल्याने संपुष्टात आला आहे असे अनेकांना वाटले. परंतु, चव्हाण यांच्या निधी रद्दचा घाव वर्मी लागल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते सतत शिंदे पिता पुत्रांना लक्ष्य करत असल्याचे समजते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A political battle dombivli minister ravindra chavan and chief minister eknath shinde group accusations ysh

ताज्या बातम्या