scorecardresearch

ठाण्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे कासव

ठाण्यातील खोपट परिसरातील ब्रह्माळा तलावात सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक कासव तरंगत असल्याचे नागरिकांना दिसून आले.

ठाण्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे कासव
ठाण्यात आढळले दुर्मिळ प्रजातीचे कासव

ठाणे येथील खोपट परिसरातील ब्रह्माळा तलावात सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास ‘लीथ सॉफ्टशेल’ या दुर्मिळ प्रजातीचे कासव आढळून आले आहे. या तलावात हे कासव तरंगत असल्याची माहिती मिळताच ठाण्यातील वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन संस्था आणि ठाणे वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन कासवाला तलावातून बाहेर काढले. या कासवाची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यात कासवाच्या फुप्फुसांमध्ये संसर्ग झाल्याने त्याला श्वास घेण्यास त्रास होत असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे त्याला संस्थेच्या मानपाडा येथील निवारा केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा – कल्याण डोंबिवली पालिका शाळेतील विद्यार्थी गणवेशापासून वंचित

ठाण्यातील खोपट परिसरातील ब्रह्माळा तलावात सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक कासव तरंगत असल्याचे नागरिकांना दिसून आले. याबाबतची माहिती नागरिकांकडून मिळताच ठाण्यातील वाइल्ड लाइफ वेल्फेअर असोसिएशन या संस्थेचे स्वयंसेवक आणि वनविभागाचे पथकाने घटनास्थळी धाव घेतली. संस्थेचे स्वयंसेवक आणि वनविभागाच्या पथकाने कासवाला तलावातून बाहेर काढून त्याची पाहाणी केली. त्यात हे कासव लीथ सॉफ्टशेल या दुर्मिळ प्रजातीचे असल्याचे उघडकीस आले. या कासवाचे वजन २० किलो आहे. तर त्याची लांबी ३ फूट आणि रुंदी २ फूट आहे. हा नर कासव आहे. या कासवाची आरोग्य तपासणी करण्यात आली असून त्यात त्याच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची जखम आढळून आलेली नाही. क्ष-किरण तपासणी केल्यानंतर त्या कासवाच्या फुप्फुसाला संसर्ग झाला असून यामुळेच त्याला श्वसनाचा त्रास होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानंतर त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले. सद्यस्थितीला हे कासव संस्थेच्या मानपाडा येथील निवारा केंद्रात उपचारासाठी ठेवण्यात आले आहे. हे कासव दुर्मिळ प्रजातीचे असल्यामुळे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्याला वनविभागाकडे सूर्पूद करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष आदित्य पाटील यांनी दिली.

हे कासव कोठे आढळते?

लीथ सॉफ्टशेल हे कासव दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भारतातील नद्या आणि जलाशयांमध्ये प्रामुख्याने वास्तव्य करते. मासे, खेकडे, अळ्या हे अन्न म्हणून सेवन करत असते. तसेच हे कासव आंतरराष्ट्रीय युनियन फॉर कन्झवर्हेशन ऑफ नेचर अंतर्गत धोकादायक म्हणून सूचीबद्ध आहे आणि वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत देखील संरक्षित प्रजातीचे कासव आहे.

मराठीतील सर्व ठाणे न्यूज ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: A rare species of tortoise found in thane amy

ताज्या बातम्या