डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या तबला वादकाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक सम्राट अनंत मगरे (१९) हा सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतो. त्याने युवा तबला वादकाला लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा विष्णुनगर पोलिसांनी जप्त केली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात मोहन भोईर यांचे कुटुंब राहते. मोहन यांचा मुलगा साई (१३) तबला शिकण्यासाठी भागशाळा मैदानातील एका खासगी शिकवणी वर्गात नियमित रिक्षेने येजा करतो. गेल्या बुधवारी रात्री आठ वाजता शिकवणी संपली. साईने घरी जाण्यासाठी भागशाळा मैदानाजवळ एक रिक्षा पकडली. रिक्षाचालक सम्राट मगरेने साईच्या गळ्यातील सोनसाखळी बघितली. तो लुटण्याचा विचार त्याच्या मनात आला. रिक्षाचालक सम्राटने तबला वादक साई भोईरला रिक्षात घेतले.

सम्राटला साईच्या गळ्यातील सोनसाखळी लुटायची असल्याने त्याने भागशाळा मैदानाकडून रिक्षा ठाकुर्ली पुलाकडील निर्जन झाडेझुडपे असलेल्या रस्त्याने नेली. साईने चालकाला मला देवी चौकात जायचं आहे. तुम्ही रिक्षा चुकीच्या दिशेने नेत आहात असे सुचविले. आपणास एका मित्राला सोबत घ्यायचे आहे असे सांगून चालक सम्राटने रिक्षा ठाकुर्ली पुलाकडील बावनचाळ निर्जन ठिकाणी नेली. तिथे सम्राटने साईच्या गळ्यातील सोनसाखळी काढून घेतली. साईने त्याला विरोध केला. ही सोनसाखळी लहान मुलाने घालायची नसते. ती आपण तुझ्या आईच्या हातात देणार आहोत, असे सांगून सम्राटने रिक्षा पुन्हा देवी चौकाकडे नेली.

साईच्या आईने साईला तुला उशीर का होतोय म्हणून मोबाईलवर विचारणा केली. साईने रिक्षा चालक मला उगाच फिरवत आहे, असे सांगितले. मुलाने आपली तक्रार घरी केली, त्याच्या कुटुंबीयांकडून आपण पकडले जाऊ शकतो अशी भीती सम्राटला वाटली. रिक्षाचालक आपणास पळून नेईल या भीतीने साईने त्याला एकेठिकाणी रिक्षा थांबविण्यास सांगितली. सम्राटने वेगाने रिक्षा पळवली. साईने धावत्या रिक्षेतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्याच्या हातमधील मोबाईल चालकाने खेचून घेण्याचा प्रयत्न केला.

या झटापटीत साईने रिक्षेतून उडी मारून घरचा रस्ता धरला. त्याने घडला प्रकार वडिलांना सांगितला. एका रिक्षा चालकाने मुलाला लुटले असल्याने वडिल मोहन यांनी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी भागशाळा मैदान, मुलाला ज्या रस्त्याने नेण्यात आले. त्या रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात सिद्धार्थनगरमधील सराईत गुन्हेगार अजय मगरे याने हा प्रकार केल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी अजयचे घर गाठले. कुटुंबीयांनी अजयचा लहान भाऊ सम्राट रिक्षा चालवितो असे सांगितले. सम्राटला पोलिसांनी सापळा लाऊन अटक केली. त्याने साईला लुटल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १५ ग्रॅम वजनाची सोनसाखळी आणि त्याची सव्वा लाख किमतीची रिक्षा जप्त केली. सम्राटने आणखी असे प्रकार केले आहेत का याचा तपास पोलीस करत आहेत.