दुचाकीवरून जात असताना पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील दोघांपैकी एकाने दुचाकीवरील विद्यार्थिनीच्या पॅन्टमधील मोबाईल हिसकावून पळ काढला. विद्यार्थिनी दुचाकी स्वारांचा पाठलाग केला. ते पळून जाण्यात यशस्वी झाले.

कल्याण पश्चिमेतील रामबाग गल्ली क्रमांक चारमधील संकेश भोईर यांच्या शिवसेना शाखे जवळील वळणावर हा प्रकार घडला. अशिका कृपाशंकर सिंग (२१) असे विद्यार्थिनीचे नाव आहे. ती बेतुरकरपाडा येथे राहते. अशिका सिंग ही आपल्या दुचाकीवरून रामबाग गल्लीतून शिवसेना शाखेजवळील रस्त्यावरून जात होती. वळण घेत असताना तिच्या पाठीमागून एका दुचाकीवर दोन बसलेले तरुण आले. ते पुढे जात आहेत असे अशिकाला वाटले. तिने त्यांना पुढे जाण्यासाठी बाजू दिली. तेवढ्यात दुचाकीवरील पाठीमागे बसलेल्या तरुणाने अशिकाच्या पॅन्टमध्ये ठेवलेला मोबाईल काढून दुचाकीवरून वेगाने पळ काढला. काही कळण्याच्या आत ही घटना घडली.

अशिकाने चोर ओरडा करून दुचाकी स्वारांचा पाठलाग केला. ते पळून गेले. १२ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याने अशिकाने महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

डोंबिवली, कल्याणमध्ये दररोज एक ते दोन मोबाईल, मोटार चोरीच्या घटना घडत आहेत. वाढत्या चोऱ्यांमुळे रहिवासी हैराण आहेत. दर आठवड्याला सामाजिक सलोख्यासाठी आनंदी रस्ते उपक्रम राबविणाऱ्या पोलिसांनी अधिकची गस्त ठेऊन गुन्हेगारांना पकडण्याकडे लक्ष देण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.