ठाणे: नौपाडा येथील सरस्वती मंदिर ट्रस्ट शाळेत दुसरीत शिकणारा विद्यार्थी शिक्षिकेने मारल्याने तणावात गेल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. शिक्षिकेने विद्यार्थ्याच्या डोक्यात स्टीलच्या छडीने मारले. त्यामुळे विद्यार्थ्याच्या डोक्यात रक्तस्त्राव झाला. तसेच त्याने लिखाण केलेल्या वहीचे पान फाडून त्याला वर्गात लिखाण करुन दिले नाही. विद्यार्थी तणावात आल्याने मुलाच्या पालकांनी याप्रकरणी पंकजा राजे या शिक्षिकेविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेनंतर आणखी काही विद्यार्थ्यांचे पालक शिक्षिकेविरोधात पुढे आले आहेत. त्यांच्या मुलांसोबत देखील शिक्षिकेने असाच प्रकार केल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठाण्यातील नामांकित शाळांपैकी सरस्वती मंदिर ट्रस्ट ही शाळा आहे. हजारो विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतात. कोरम माॅल परिसरात राहणाऱ्या कस्तुरी आणि सचिन घाणेकर यांच्या आठ वर्षीय मुलगा देखील शाळेत इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेतो. त्याच्या वर्गशिक्षिका पंकजा राजे या आहेत. सुमारे महिन्याभरापूर्वी मुलगा घरी रडत आला होता. त्यामुळे कस्तुरी यांनी त्याची विचारणा केली असता, शाळेत वही नेली नाही म्हणून शिक्षिका पंकजा राजे यांनी त्याच्या डोक्यात स्टीलच्या पट्टीने मारल्याचे सांगितले. त्यावेळी त्याच्या डोक्यातून रक्तस्त्रावर आला होता. तसेच त्याला दुसऱ्या वहीमध्ये कोणताही अभ्यास करु दिला नाही. त्याने लिहीण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्या वहीची पाने शिक्षिकेने फाडून फेकून दिली. या घटनेनंतर त्यांच्या मुलाचा स्वभाव बदलला होता. त्याला डाॅक्टरांकडे नेले असता, तो तणावात असल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. घटना घडल्याच्या पाच दिवसांनी कस्तुरी या त्यांच्या पतीसोबत शाळेमध्ये जाब विचारण्यासाठी गेल्या. तिथे मुख्याध्यापिकांनी पंकजा राजे यांना पालकांसमोर विचारणा केली. परंतु शिक्षिकेने या घटनेबद्दल उडवा-उडवीची उत्तरे दिली. तसेच पालकांशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>टीएमटी बसचे चाक पायावरून जाऊन तरुणी गंभीर जखमी

पालकांनी २९ जुलैला पंकजा राजे यांच्याविरोधात ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे आणि शाळेकडे लेखी तक्रार दाखल केली. शाळेने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली नसल्याने त्यांनी मनसेचे नेते अविनाश जाधव यांची भेट घेतली. तसेच घडलेला प्रकार सांगितला. या घटनेची माहिती इतर पालकांना समजली असता, आणखी सहा पालकांनी संबंधित शिक्षिकेविरोधात पुढे आले आहेत. त्यांच्या पाल्याला देखील शिक्षिकेने अशाचप्रकारे त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी कस्तुरी यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या शिक्षिकेने सुमारे वर्षभरापूर्वी विद्यार्थी खोटे बोलतो, म्हणून त्याच्यावर कविता केली. त्यानंतर ती कविता वर्गातील इतर ३० ते ४० मुलांना बोलण्यास भाग पाडले. अशा मानसिकतेचे शिक्षक असतील. तर शाळा कशा सुरू राहतील. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्याला डोक्यात पट्टी मारल्यानंतर त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाला. परंतु शाळेने कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे शाळा प्रशासन देखील तितकेच दोषी आहे. – अविनाश जाधव, नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना.

माझ्या मुलाला डोक्यात पट्टी मारल्यानंतर शाळा प्रशासनाकडे तक्रार दिली. परंतु शिक्षिकेवर कोणतीही कारवाई झाली नव्हती. शिक्षिकेविरोधात आणखी सहा पालक आता पुढे आले. त्या शिक्षिकेने इतर अनेक विद्यार्थ्यांना त्रास दिला आहे. आम्ही संबंधित शिक्षिकेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. – कस्तुरी घाणेकर, पालक.

महापालिकेने परवानगी दिल्यानंतर आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. संबंधित शिक्षिकेला शिकविण्यासाठी कोणताही वर्ग देण्यात येणार नाही. आम्ही पालकांसोबतच आहोत. – सुरेन्द्र दिघे, कार्यकारी विश्वस्त, सरस्वती मंदिर ट्रस्ट.