A three year old girl was murder in Bhiwandi in Thane ssb 93 | Loksatta

ठाणे : भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

girl murder Bhiwandi Thane
भिवंडीत तीन वर्षांच्या मुलीची हत्या (प्रातिनिधिक छायाचित्र)

भिवंडी येथील शांतीनगर भागात एका तीन वर्षीय मुलीची हत्या करण्यात आल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. गळा दाबून तिची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती भिवंडीचे उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली.

शांतीनगर येथील नागाव भागात मुलगी तिचे आई-वडील आणि दोन भावंडासोबत राहते. तिचे आई-वडील परिसरात भंगार विक्रीचा व्यवसाय करतात. त्यामुळे आई-वडील त्या मुलांना घरीच ठेवून कामासाठी जात असतात. मंगळवारी मुलीचे आई-वडील सकाळी कामाला गेले होते. दुपारी ते परतल्यानंतर त्यांची तीन वर्षीय मुलगी त्यांना दिसली नाही. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंचा दौरा, शिवसेनेतील बंडाळीनंतर प्रथमच ठाण्यात

हेही वाचा – ठाण्यात भाजपने साजरा केला उत्तर प्रदेश स्थापना दिवस, शहरातील चार ठिकाणी पार पडला कार्यक्रम

पोलिसांचे पथक मुलीचा शोध घेत असताना बुधवारी सकाळी एका पडिक घरामध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला. तिचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी मुंबई येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. हत्ये प्रकरणात आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच भिवंडीत एका तीन वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यानंतर तीन वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-01-2023 at 18:29 IST
Next Story
ठाण्यात भाजपने साजरा केला उत्तर प्रदेश स्थापना दिवस, शहरातील चार ठिकाणी पार पडला कार्यक्रम