कल्याण- काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावा जवळ रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये एका दुचाकी स्वाराची दुचाकी जोराने आपटली. चालकाचा दुचाकी चालविताना तोल जाऊन त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो बाजुने चाललेल्या कल्याण डोंबिवली पालिका परिवहन उपक्रमाच्या पनवेल बसवर जाऊन आदळला. दुचाकीसह तो बसच्या मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनिवारी सकाळी कल्याण शिळफाटा रस्त्या लगतच्या काटई-बदलापूर रस्त्यावरील खोणी गावा जवळील म्हाडा गृहनिर्माण वसाहती समोर ही दुर्घटना घडली. अंकित थैवा (२६) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो अंबरनाथ येथील रहिवासी आहे. अंकित नवी मुंबईतील घणसोली येथील हेल्थ केअर फार्मा कंपनीत नोकरीला होता. तो दररोज ॲक्टिवा (क्र. एमएच-०५-ईडी-८२२५) दुचाकीवरून घणसोली येथे कामाला जात होता. केडीएमटी बस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा ठपका ठेवत अंकितचे वडील रामकुमार थैवा (५४) यांनी बस चालका विरुध्द मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा नोंद केला.

पोलिसांनी सांगितले, केडीएमटी परिवहन उपक्रमाची कल्याण ते पनवेल बस काटई-बदलापूर रस्त्याने खोणी-तळोजा मार्गे पनवेल येथे शनिवारी सकाळी नऊ वाजता चालली होती. खोणी रस्त्यावरून जात असताना बसचा चालक खड्डे चुकवित बस चालवित होता. म्हाडा वसाहती समोरून बस जात असताना या बसच्या उजव्या बाजुने ॲक्टिव्हा दुचाकीवरून अंकित थैवा बसला समांतर दुचाकी चालवत कामाच्या ठिकाणी चालला होता. खोणी गावचा बस थांबा येण्यापूर्वीच म्हाडा वसाहती समोर अंकित रस्त्यावरील एका मोठ्या खड्ड्यात जोराने दुचाकीसह आपटला. त्याचा तोल जाऊन तो दुचाकीसह केडीएमटी बसच्या मागील बाजुला येऊन आदळला.

धावत्या बसचा फटका बसल्याने दुचाकी बाजुला फेकली जाऊन अंकित बसच्या मागील टायरखाली आला. त्याचा जागीच मृत्यू झाला. बसच्या पाठीमागील बाजुला आवाज झाल्याने चालकाने दर्शक आरशातून पाहिले तेव्हा त्याला एक दुचाकी स्वार पडल्याचे दिसले. त्याने पुढे जाऊन बस थांबविली. त्यावेळी त्याच्या खड्ड्यात दुचाकी आपटून बसवर आदळली असल्याचे दिसले.
बस चालकाने ही माहिती केडीएमटी परिवहन महाव्यवस्थापक, साहाय्यक परिवहन व्यवस्थापक संदीप भोसले यांना दिली. भोसले यांनी तातडीने ही माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात अंकितला मृत घोषित करण्यात आले. केडीएमटी बस चालकाचा जबाब पोलिसांनी घेतला. पोलिसांनी अंकितचे वडिल रामकुमार यादव यांना माहिती दिली. रामकुमार अंबरनाथ एमआयडीसीतील एका कंपनीत चालक म्हणून काम करतात.

चौथी दुर्घटना

कल्याण, डोंबिवली परिसरातील पालिका, सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळाच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. संबंधित प्राधिकरणे वेळीच खड्डे बुजवित नसल्याने प्रवासी, वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. जुलै महिन्यात कल्याण-मुरबाड रस्त्यावरील म्हारळ गावां जवळील खड्ड्यांमध्ये दुचाकीसह आपटून नारायण भोईर या दूध विक्रेत्याचा मृत्यू झाला. कल्याण पश्चिमेतील टिळकचौक, सिध्देश्वर आळीत राहणारे सनदी लेखापाल रवींद्र पै, गणेश सहस्त्रबुध्दे या ज्येष्ठ नागरिकांचा टिळक चौकातील खड्डयात पाय मुरगळून ते जमिनीवर पडले. या दोघांच्या हाताला गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. या खड्ड्यांना जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय शासनाने तीन वर्षापूर्वी घेतला आहे. त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने त्याचा फटका नागरिकांना बसत आहे.

खोणी रस्त्यावरून केडीेएमटीची पनवेल बस जात असताना बसला समांतर चाललेल्या तरुणाची दुचाकी खड्ड्यात आपटून दुचाकी स्वार बसवर आदळला. बसच्या मागच्या टायर खाली येऊन त्याचा मृत्यू झाला. – संदीप भोसले, साहाय्यक परिवहन व्यवस्थापक

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A young man died under the tires of a kdmt bus after his two wheeler hit a pothole near dombivli amy
First published on: 16-07-2022 at 15:37 IST