ठाणे: कोणाला मारु नको असे समजाविणाऱ्या तरुणावरच त्याच्या मित्राने चाकूने वार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
वागळे इस्टेट भागात ३४ वर्षीय जखमी मुलगा राहतो. याच भागात त्याचा मित्र मंगेश खराटे हा देखील राहतो. खराटे याचे याच भागात एक दुकान आहे. त्या दुकानामध्ये तरुण साहित्य खरेदी करण्यासाठी गेले होते. त्यावेळी मंगेश हा कोणाला तरी चाकू घेऊन मारायला निघाल्याची माहिती त्याच्या पत्नीने तरुणाला दिली. तरुण पायी जात असताना, मंगेश हा त्याठिकाणाहून दुचाकीने जात होता. त्या तरुणाने मंगेश याला अडवून त्याला समजाविण्यास सुरुवात केली. ‘तु कोणाला मारायला निघाला आहेस, असे करु नको’ असे त्या तरुणाने मंगेश याला समजावले.
परंतु मंगेश याने खिशातील चाकू बाहेर काढला. तरुणाने त्याचा हात पकडून त्याच्या हातातील चाकू खेचला. तसेच, त्याला घरी निघून जाण्यास सांगितले. परंतु मंगेश त्या तरुणासोबतच वाद घालण्यास सुरुवात करु लागला. त्यामुळे तरुणाने त्याच्या हातातील चाकू पुन्हा मंगेशकडे दिला. मंगेशच्या हातात चाकू मिळताच, त्याने तरुणाच्या पोटावर दोन ठिकाणी वार केले.
यानंतर तरुणाने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी तरुणाची वहिणी त्याठिकाणी आली. तरुणाच्या पोटातून रक्तस्त्राव होत असल्याने तिने तात्काळ तरुणाला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारानंतर त्याने वागळे इस्टेट पोलिसांना तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे मंगेश याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ११८ (१) नुसार गुन्हा दाखल झाला आहे.