डोंबिवलीतील एका अल्पवयीन तरुणीशी इनस्टाग्रामच्या माध्यमातून राजस्थान मधील एका तरुणाने मैत्री करुन तिला विविध प्रकारची आमिषे दाखविली. तिची अश्लिल छायाचित्रे मोबाईलच्या माध्यमातून काढून ती छायाचित्रे समाज माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला विष्णुनगर पोलिसांनी राजस्थान मधील त्याच्या गावातून अटक केली.

सोहेल सलामउद्दीन खान (१८) असे आरोपीचे नाव आहे. तो राजस्थान मधील चुरू जिल्ह्यामधील तारनगर गावचा रहिवासी आहे. डोंबिवलीतील पीडित तरुणीची सोहेल खान याच्या बरोबर इनस्टाग्रामच्या माध्यमातून मैत्री झाली होती. अनेक महिने त्यांचा ऑनलाईन प्रणालीतून संवाद सुरू होता. काही कारणांवरुन सोहेल, पीडित तरुणी यांच्या खडके उडू लागले. तिने त्याच्या बरोबरचे बोलणे कमी केले. गेल्या महिन्यापासून पीडित तरुणीने सोहेल याला प्रतिसाद देणे बंद केले. त्याचा राग सोहेल याला आला. माझ्याशी बोलली नाही तर तुझी बदनामी करीन अशी धमकी तो पीडितेला देऊ लागला. त्याने पीडितेला काही कळून न देता तिची अश्लिल छायाचित्रे मोबाईलच्या माध्यमातून काढली होती.

सोहेल आपणास ब्लॅकमेल करत आहे याची जाणीव पीडितेला झाली होती. पण ती काही बोलू शकत नव्हती. कुटुंबीयांना सांगितले तर त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे पीडितेला वाटत होते. समाज माध्यमात अश्लिल छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी सोहेल नियमित देऊ लागल्याने पीडित तरुणी घाबरली. तिने धाडस करुन घरात आपल्या भोवती सुरू असलेला प्रकार सांगितला. मुलीसोबत होत असलेला प्रकार पाहून कुटुंबीय हादरले.

मुलीच्या वडिलांनी तात्काळ विष्णुनगर पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांना माहिती दिली. पोलिसांनी गेल्या महिन्यात १४ जुलै रोजी याप्रकरणी तक्रार दाखल करुन आरोपीचा शोध सुरू केला होता. वरिष्ठ निरीक्षक भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेण्यासाठी हवालदार शांताराम नागरे, किरण नलावडे, दिलीप पवार यांचे तपास पथक तयार केले. आरोपी सोहेल याच्या मोबाईलचा माग, तांत्रिक माहिती सायबर गुन्हे शाखेच्या माध्यमातून पोलिसांनी काढली. तो राजस्थान मधील असल्याचे तांत्रिक माहितीत उघड झाले. आरोपीचे नाव, पत्ता तो राहत असलेल्या ठिकाणी विष्णुनगर पोलिसांचे पथक पोहचले. दोन दिवस पाळत ठेऊन तिसऱ्या दिवशी सोहेलला पोलिसांनी त्याच्या घरातून शिताफीने अटक केली.

एका तरुणीला आपण त्रास देत होतो याची कबुली त्याने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन सोहेल खानला कल्याण न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलिसांचे आवाहन

समाज माध्यमातून कोणा बरोबर मैत्री करताना फसवणूक होण्याची, मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. असे प्रकार अलीकडे वाढले आहेत. त्यामुळे प्रत्येकाने समाज माध्यमातून अनाहुत व्यक्तिशी मैत्री करणे टा‌ळावे. ऑनलाईन प्रणालीतून अनोळखी व्यक्तिशी ऑनलाईन व्यवहार टाळावेत, असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ भालेराव यांनी केले आहे.