कल्याण : नातेवाईकांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे (व्हिडिओ) भेट घडवून आणण्याची वेळ टळून गेल्याच्या रागातून आधारवाडी तुरुंगात न्यायबंदी असलेल्या दोन सख्ख्या भावांनी मिळून मुलाखत कक्षात घुसून एका हवालदारास मारहाण केली. शासकीय कर्तव्यात अडथळा आणला म्हणून हवालदाराच्या तक्रारीवरून खडकपाडा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विक्रम उर्फ विकी राजेंद्र कवठणकर, हितेश उर्फ मोगली राजेंद्र कवठणकर अशी मारहाण प्रकरणातील न्यायबंद्यांची नावे आहेत. हे दोन्ही न्यायबंदी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपी आहेत. विकी डिसेंबर २०२५ पासून, मोगली मे २०२६ पासून आधारवाडी तुरुंगात आहे. आधारवाडी तुरुंगातील हवालदार राजू गोविंद पोरे यांना दोघांनी मारहाण केली.
हवालदार राजू पोरे यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की विकी व मोगली हे दोन्ही आरोपी आधारवाडी तुरुंगात दोन विभक्त कोठड्यांमध्ये आहेत. न्यायबंदी विकीच्या नातेवाईकांनी विकीशी दूरदृश्यप्रणालीद्वारे भेट घेण्यासाठी ऑनलाइन नोंदणीतून विनंती केली होती.
त्यानंतर सोमवार, २४ ऑगस्ट रोजी दुपारी पावणे चार वाजता विकी व त्याच्या नातेवाईकांच्या भेटीसाठी वेळ निश्चित करण्यात आली. ठरलेल्या वेळेत विकीला मुलाखत कक्षाजवळ बोलविण्यात आले. त्यावेळी त्याच्याबरोबर त्याचा भाऊ मोगली हासुद्धा आला होता. मुलाखत कक्षात संवादासाठी संगणक ठेवण्यात आला होता. मात्र, भेटीची वेळ टळून गेली तरी विकीचे नातेवाईक दूरदृश्यप्रणालीच्या माध्यमातून दोघांना भेटू शकले नाहीत. त्यासाठीचे तांत्रिक साह्यसुद्धा हवालदार पोरे पुरवले.
मात्र, विलंबाचे कारण पुढे करीत विकी व मोगली पोरे यांनी थेट पोरे यांच्या दिशेने धावले व त्यांनी पोरे यांच्यासमोरील संगणक उचलून फेकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांनी मिळून पोरे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. संतप्त झालेल्या दोघांनी गणवेशाला पकडून मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने पोरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला व त्यांना जमिनीवर आपटण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत पोरे यांच्या खांद्याला मार लागला आहे.
घटनेची माहिती मिळताच तुरुंगाधिकारी पी. यु. खरात, पी. पी. रेपाडे, आर. जी. वडते मुलाखत कक्षात आले. त्यांनी विकी, मोगली या दोन्ही बंद्यांना कक्षातून बाहेर काढुन त्यांना त्यांच्या कोठडीत नेले. शासकीय कामात अडथळा आणून आपणास मारहाण केल्याबद्दल विकी, मोगली यांच्याविरुद्ध हवालदार पोरे यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.
