शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील पदाधिकारी प्रदीप पूर्णेकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (२९ सप्टेंबर) घडली आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. काही हल्लेखोर प्रदीप पूर्णेकर यांच्या मनोरमा नगर येथील कार्यालयात घुसले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये प्रदीप पूर्णेकर हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया समोर येत असून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेवर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे. ‘राज्यात कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्यात, सामान्य माणसाचं जगणं कठीण होत चाललंय’, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी काय म्हटलं?
“आमच्या पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काल रात्री ठाणे परिसरात काही अज्ञातांकडून हत्या करण्यात आली. ही घटना अतिशय चीड आणणारी आणि घृणास्पद आहे. या राज्यात कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या झालेल्या आहेत, हे पुन्हा पुन्हा सिद्ध झालं आहे. सामान्य माणसाचं सुरक्षित जगणं कठीण होत चाललंय”, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.
“पोलीस त्यांचं काम करण्याचा प्रयत्न करतील, पण राजकीय पक्षांकडूनच गुन्हेगारीला खतपाणी मिळणारं वातावरण तयार होत असेल तर पोलीस विभाग तरी काय करणार? या हत्येतील गुन्हेगारांना आणि त्यामागील शक्तीला ताबडतोब अटक होईल अशी अपेक्षा करतो. तसंच, प्रदीप पूर्णेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या कुटुंबीयांना या कठीण प्रसंगाला सामोरं जाण्याचं बळ मिळो अशी प्रार्थना करतो”, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर संजय राऊतांचा संताप
शिवसेना (ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून तसेच धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने ठाण्यात खळबळ उडाली आहे. या घटनेवरून खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकार तसेच गृहखात्यावर तीव्र टीका केली. प्रदीप पूर्णेकर यांचा स्थानिक राजकीय संघर्ष सुरू होता आणि ते मनोरमानगर परिसरातील बिल्डर लॉबी तसेच ड्रग्स नेटवर्कविरोधात सातत्याने आवाज उठवत होते, असा दावा राऊत यांनी केला. संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत या हत्येवर संताप व्यक्त केला. “प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली, गृह खात्याचे हे धिंडवडे आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
