ठाणे : आगरी समाजाच्या संघटनात्मक चळवळीला दिशा देणारे, आगरी सेनेचे संस्थापक राजाराम साळवी यांचे शनिवारी सायंकाळी निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी कळवा येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
कळवा येथील मनीषानगर परिसरात राजाराम साळवी हे वास्तव्यास होते. त्यांनी १ ऑगस्ट १९८६ रोजी आगरी सेनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या आगरी समाजाला संघटित करण्याचे काम केले. आगरी समाज तसेच ओबीसी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेत अनेक आंदोलने उभारली होती.
कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी ‘कामगार एकता’ या कर्मचारी संघटनेची स्थापना केली होती. शहाड येथील सेंच्युरी रेयॉनसह ठाणे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली कामगार संघटना कार्यरत आहेत. कामगारांच्या विविध प्रश्नांसाठी त्यांनी यशस्वी लढे उभारून अनेकांना न्याय मिळवून दिला. त्यामुळे सामाजिक कार्याबरोबरच कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी योगदान देत कळवा येथे मनीषा शिक्षण संस्थेची स्थापना केली. राज्य सरकारच्या ओबीसी महामंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. समाजहिताला प्राधान्य देणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. शनिवारी सायंकाळी अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना कळवा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर आगरी सेनेचे कार्यकर्ते, समर्थक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कळवा येथील त्यांच्या निवासस्थानी धाव घेतली.
त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून त्यानंतर कळवा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या निधनामुळे आगरी समाजातील एका लढवय्या, अभ्यासू आणि परखड नेतृत्वाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
