कल्याण – उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे डोंबिवलीतील निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते अभिजीत सावंत यांची पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती केली. सावंत हे आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखालील शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. त्यांच्या या निवडीबद्दल कल्याण, डोंबिवलीत समाधान व्यक्त केले जात आहे.

शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर पक्षातील अनेक ज्येष्ठ, तळागाळातील शिवसैनिक शिंदे शिवसेनेत दाखल झाले. पण विविध प्रकारचा दबाव असुनही शिवसेनाप्रमुख, आनंद दिघे यांच्यावरील प्रखर निष्ठेमुळे अभिजीत सावंत यांनी उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात राहणे पसंत केले. ठाकरे पक्षात सावंत यांनी शहरप्रमुख, विधानसभा प्रमुख, कल्याण लोकसभा सचिव पदांवर काम केले आहे. सर्वांना सोबत काम करून घेण्याची त्यांची सवय आहे.

कल्याण लोकसभा, विधानसभा निवडणूक काळात आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी सावंत यांनी विशेष प्रयत्न केले होते. एक निष्ठावान समर्पित भावाचा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आपल्यावर जी मोठी जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी आपण स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने नक्की यशस्वीपणे पार पाडू. कल्याण लोकसभा परिसरात पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीन. तसेच, ही कामे करत असताना नागरिकांच्या नागरी समस्या, विकास कामांचे प्रश्न या विषयावर आपण वेळोवेळी शासन, पालिका स्तरावर आवाज उठविणार आहोत. पक्षप्रमुखांना दिलेली जबाबदारी आपण निष्ठेने पार पाडू, असे जिल्हाप्रमुख अभिजीत सावंत यांनी सांगितले.

जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाल्यानंतर सावंत यांनी कल्याण लोकसभेचे संपर्कप्रमुख गुरूनाथ खोत, ठाकरे गटाचे कल्याण शहरप्रमुख शरद पाटील यांच्यासह पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचे मार्गदर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते संजय राऊत, उपनेते बाळ माने उपस्थित होते.

यावेळी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख सावंत यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांना कल्याण, डोंबिवली शहर परिसरात पक्ष बांधणीच्या दृष्टीने करावयाचे प्रयत्न. यासाठी मुंबईतून ज्येष्ठ नेत्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळेल अशी ग्वाही दिली.

पक्ष बांधणी, वाढ आणि त्याच बरोबर नागरिकांचे नागरी समस्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर देण्याच्या सूचना उध्दव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना केल्या. आपण दिलेल्या सूचनेप्रमाणे काम करून पक्ष संघटना वाढीसाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सावंत यांनी पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना दिले.