सुहास बिऱ्हाडे

मोठय़ा हिमतीने विरारमधील स्थानिक महिला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षा व्यवसायात उतरल्या. मात्र त्यांचा पुरुष रिक्षावाल्यांकडून छळ होऊ लागला. पोलीसही अर्थपूर्ण संबंधांमुळे या पुरुष रिक्षावाल्यांची साथ देऊ  लागले. सतत शिवीगाळ, दादागिरी, मारहाण होऊ  लागली, आणि गुन्हे पण दाखल केले जाऊ  लागले. त्यामुळे महिलांना आता कर्ज काढून घेतलेल्या रिक्षा बंद करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही.

रिक्षाच्या व्यवसायातही महिलांनी उतरून स्वयंरोजगार करावा असे सरकारने ठरवले आणि महिलांना रिक्षा परवान्यात ५ टक्के आरक्षण ठेवण्यात आले होते. अबोली योजनेच्या निमित्ताने ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली. महिलांना रिक्षा चालविण्याचे परवाने देण्यात आले. मात्र विरारमधील अबोली रिक्षाचालक महिलांना मार्ग मात्र खडतरच राहिला आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या रिक्षा व्यवसायात या महिला उतरल्या. नियमाप्रमाणे सर्व पूर्तता करून, प्रशिक्षण घेतले, कर्ज काढून रिक्षा घेतल्या पण पुरुषी मानसिकतेचा आणि भ्रष्ट व्यवस्थेचा त्यांना सामना करावा लागत आहे. या महिलांना पुरुष रिक्षाचालकांकडून अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रिक्षाचालकांशी अर्थपूर्ण संबंध असलेली पोलीस यंत्रणाही या पुरुष रिक्षाचालकांच्या बाजूने उतरली असून महिलांवरच गुन्हे दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

रिक्षा चालवणे हे पुरुषांचे काम. पूर्वी जो बेरोजगार असे, त्याचे शिक्षण नसे, तो रिक्षा चालवत असे. परप्रांतातून मुंबई आणि परिसरात आलेल्यांचा रिक्षा, टॅक्सी चालवणे हा हक्काचा व्यवसाय. आजही रिक्षा-टॅक्सीच्या व्यवसायात ९० टक्के हे परप्रांतीय आहेत. वसई विरार शहरातही हीच परिस्थिती. आक्षेप त्यांच्या परप्रांतीय असण्यावर अजिबात नाही. मात्र वसईत हजारो रिक्षा या बेकायदेशीर आहेत. त्या बेकायदेशीर असल्याने पुढील सर्वच गोष्टी बेकायदेशीर असतात. काही महिन्यांप्रू्वी पालघरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनीच वसई विरार शहरात साडेतीन हजार बेकायदेशीर रिक्षा असल्याचे सांगितले होते. त्यावरून या बेकायदेशीर रिक्षाचालकांची कल्पना येते. सर्वच प्रवाशांना रिक्षाचालकांचा वाईट अनुभव आलेला असतो. त्यांची मग्रुरी, अरेरावी, अर्वाच्च्य भाषा, दादागिरीचा अनुभव प्रत्येकाला कधीना कधी आला असतो. रिक्षाचालकांकडून पान, गुटखा खाऊन शहरातील रस्ते अस्वच्छ करणेही नवीन नाही. अशा वातावरणात या पुरुषांची मक्तेदारी असलेल्या व्यवसायात स्थानिक मराठी महिलांनी पुढे यावे यासाठी अबोली नावाची योजना राज्य सरकारने सुरू केली होती. पाच टक्के स्थानिक महिलांना त्यासाठी आरक्षण देणयात आले. विरार शहरात १२ हून अधिक महिलांनी परवाने काढून स्वता: रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. ज्या शहरात पूर्वी एकही महिला रिक्षाचालक नसायची त्या ठिकणी आता महिला दिसू लागल्या. मात्र या अबोलींचा मार्ग खडतरच राहिला आहे.

महिलांना सरपंचपदासाठी आरक्षण मिळाल्यानंतर महिला सरपंच होऊ  लागल्या होत्या. तेव्हा त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणून महिला सरपंचांना बडतर्फ केले जाऊ  लागले होते. असाच प्रकार या महिला रिक्षाचालकांच्या बाबतीत होऊ  लागलेला आहे. मुळात या महिला  रिक्षाचालक रस्त्यावर उतरल्या हे पुरुष रिक्षाचालकांना सहन होत नव्हते. त्यामुळे त्यांना अश्लील  शेरेबाजी, टोमणे मारणे दादागिरी करणे असे प्रकार सुरू होते. विरारमधील महिला रिक्षाचालकांना याचा त्रास होऊ  लागला. त्यांना प्रवासी भरू न देणे, प्रवासी उतरवणे असे प्रकार सुरू झाले. त्यांच्या रिक्षाच्या टायरची हवा काढून टाकणे, चाकाखाली खिळे टाकून त्यांच्या रिक्षा नादुरुस्त टाकणे, असे प्रकार होऊ  लागले आहेत. भर रस्त्यात या महिला रिक्षाचालकांना मारहाणही करण्यात आली. महिलांनी तक्रारी केल्यावर शेकडोंनी पुरुष रिक्षाचालक पुरुषांच्या समर्थनार्थ येऊ  लागली. महिला रिक्षाचालक दादागिरी करतात, असा हास्यास्पद आरोप करत हे पुरुष रिक्षाचालक बंद करू लागले. पोलिसांकडे बैठका झाल्या. पण तोगडा काही निघाला नाही. उलट महिलांच्या विरोधात पुरुष रिक्षाचालक अधिकच आक्रमक झाले. महिला रिक्षाचालकांना भररस्त्यात मारहाण केल्याने एका रिक्षाचालकाविरोधात विनयभंगाचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

महिला रिक्षाचालक या स्थानिक आणि संसारी आहेत. घर आवरून सकाळी दहा ते सहा या वेळेत रिक्षा चालवतात. मात्र तेवढय़ा वेळेतही या महिलांनी रस्त्यावर उतरणे या पुरुष रिक्षाचालकांना सहन होत नाही. महिलांनी आता स्वतंत्र रिक्षा थांबा देण्याची मागणी केली आहे. ती अद्याप मंजूर झालेली नाही. वाहतूक पोलीस पुरुष रिक्षाचालकांचीच बाजू घेतात. वाहतूक पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सांगितले की, जनमत महिला रिक्षाचालकांच्या विरोधात आहे. जनमत म्हणजे काय? तर पुरुष रिक्षाचालकांनी दिलेले मत. महिलांना न्याय देण्याचे सोडून ते पुरुष रिक्षाचालकांच्या बाजूने आहेत. मागील आठवडय़ात तर एका महिला रिक्षाचालकावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला. पुरुषी मानसिकतेचा त्रास, सतत होणारी आडकाठी, पोलिसांचा जाच यामुळे महिला रिक्षाचालक त्रस्त झाल्या आहेत.

suhas.birhade@expressindia.com