‘अबोली’ रिक्षाचालकांची मागणी; पुरुष रिक्षाचालकांकडून त्रास होत असल्याचा आरोप

विरार महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून होत असलेल्या त्रासामुळे त्यांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. कर्ज काढून घेतलेल्या रिक्षांचे हप्ते कसे भरायचे, असा प्रश्न महिलांना पडला आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या या व्यवसायात टिकायचे असेल तर स्वतंत्र थांबा मिळावा, अशी मागणी महिलांनी केली आहे.

वसई-विरार शहरातील महिला रिक्षाचालकांना पुरुष रिक्षाचालकांकडून अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. विरार पूर्वेच्या फूलपाडा येथे १० महिला रिक्षाचालक काम करतात. सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत त्या रिक्षा चालवतात. शासनाच्या अबोली योजनेअंतर्गत त्यांनी नियमानुसार परवाना काढून रिक्षा घेतल्या. मात्र वाहतूक पोलीस आणि पुरुष रिक्षाचालकांच्या युतीमुळे या महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. यापैकी अनेक रिक्षाचालक बेकायदा रिक्षा चालवतात. त्यांचे पोलिसांशी अर्थपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे ते महिला रिक्षाचालकांना आडकाठी करत आहेत, असे महिला रिक्षाचालक दर्शिका विसावाडिया यांनी सांगितले. फूलपाडा येथे आम्हाला इतर रिक्षाचालक प्रवासी भरू देत नाही. त्यांच्या रांगेत आम्ही थांबलो तर खूप वेळ जातो. आमच्याकडे प्रवासी आले तर ते आमच्या प्रवाशांना दमदाटी करतात, असे त्यांनी सांगितले.

महिला रिक्षाचालकांची गरज ओळखून त्यांना स्वतंत्र रिक्षास्टॅण्ड देण्याची मागणी महिला रिक्षाचालकांनी केली आहे. याबाबत पोलीस आणि रिक्षाचालकांनी बैठक झाली होती. पाच पुरुष रिक्षाचालकांमागे एक महिला रिक्षाचालक देण्याचे ठरले होते. परंतु तरीदेखील पुरुष रिक्षाचालक महिला रिक्षाचालकांना प्रवासी भरू देत नाही, असे निदर्शनास आले आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे स्वतंत्र महिला रिक्षास्टॅण्ड देण्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही महिलांना पाच रिक्षामागे एक रिक्षा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र तो नियमानुसार नसल्याने याची अंमलबजावणी न करणाऱ्या पुरुष रिक्षाचालकांवर कारवाई करू शकत नसल्याचे उपअधीक्षक जयंत बजबळे यांनी सांगितले.

प्रवाशांना महिलांच्या रिक्षामध्ये सुरक्षित वाटते. तेच इतर पुरुष रिक्षाचालकांच्या डोळ्यात खुपत आहे. बेकायदा रिक्षांचा वसई-विरारमध्ये सुळसुळाट झाला आहे. जर रिक्षाचालक पोलिसांचे याबाबत ऐकत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी रिक्षा टॅक्सी चालक मालक महासंघाचे अध्यक्ष विजय खेतले यांनी केली आहे.