कल्याण- कल्याण डोंबिवली पालिकेच्या नगररचना विभागातील एका अधिसंख्य पदावरील नगररचनाकाराने पालिका प्रशासनाला अंधारात ठेऊन ११ ऑगस्ट ते २२ ऑगस्ट या कालावधीत परदेश दौरा केल्याची माहिती उघडकीला आली आहे. या दौऱ्याची चर्चा पालिकेत सुरू आहे. या प्रकारावरुन एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या नगररचनाकाराची कानउघडणी करुन त्याच्यावर कारवाईचा इशारा दिला असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
कोणत्याही शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याला परदेश दौरा करायचा असेल तर त्याला प्रथम तो आस्थापनेत काम करत असलेल्या वरिष्ठांना त्याची माहिती द्यावी लागते. प्रशासन प्रमुखाने परदेश दौऱ्याची कारणे विचारात घेऊन दौऱ्याला परवानगी दिली तरच तो दौरा संबंधित कर्मचाऱ्याला करण्याची मुभा असते. परंतु, या नगररचनाकाराने प्रशासनाला परदेश दौऱ्याची कोणतीही माहिती न देता आपण खासगी कामासाठी रजेवर असल्याचे प्रशासनाला कळविले. त्या रजेच्या काळात या कर्मचाऱ्याने दुबई देशाचा १० दिवसांचा दौरा केला असल्याचे समजते.




हेही वाचा >>>प्रसिध्द लेखक आनंद नीलकांतन यांना धमकी आणि खंडणीची मागणी
नगररचना विभागात महत्वाच्या पदावर असलेल्या या कर्मचाऱ्याला काही कामासाठी पालिकेतील काही वरिष्ठ, त्याच्या सहकाऱ्यांनी मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना मोबाईलवर वेगळ्या भाषेतून ध्वनीक्षेपण ऐकविले जात होते. अशाप्रकारचे ध्वनीक्षेपण परदेश दौऱ्यात नागरिक असेल तर ते ऐकविले जाते. त्यानंतर या कर्मचाऱ्याची वरिष्ठांनी माहिती काढली. त्यावेळी हा कर्मचारी दुबई येथे दौऱ्याला गेला आहे अशी माहिती पालिका प्रशासनाला मिळाली.
आपण परदेश दौऱ्यावर गेलो आहोत. तेथे केलेल्या खर्चाची माहिती मिळू नये म्हणून या नगररचनाकाराने आपल्या विभागातील एका दुय्यम कर्मचाऱ्याचे परदेशी चलन विनिमयाचे कार्ड सोबत नेले होते. त्या कार्डमधून या कर्मचाऱ्याने परदेशात व्यवहार केल्याची माहिती उजेडात आली आहे. त्यामुळे परदेशी गेलेल्या कर्मचाऱ्याबरोबर खर्चासाठी कार्ड दिलेल्या कर्मचारीही आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>>डोंबिवली रेल्वे स्थानकात दुचाकींचे बेकायदा वाहनतळ; प्रवाशांना स्थानकात येजा करताना अडथळे
एका करदात्याने नागरिकाने यासंबंधी परदेश दौऱ्यावर गेलेल्या नगररचनाकाराची आयुक्तांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. या नगररचनाकार कर्मचाराने बांधकामाशी संबंधित काही माहिती विदेशात कोठे चर्चेला घेतली . कोणाला अदान प्रदान केली तर त्याची जबाबदारी या कर्मचाऱ्या बरोबर प्रशासनावर येणार आहे. त्यामुळे वरिष्ठांनी या नगररचनाकाराची कानउघडणी केल्याची चर्चा पालिकेत आहेत.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये सिग्नल यंत्रणेत बिघाड, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांचे हाल
याविषयी पालिकेतील एकही अधिकारी उघडपणे बोलण्यास तयार नाही. पालिकेत अधिसंख्य (कंत्राटी) पदावर हा कर्मचारी काम करतो. राजकीय पाठबळामुळे नेहमी वादाच्या भोवऱ्यात असलेला हा कर्मचारी पालिकेचा निम्म कारभार एका दालनातून चालवितो. बांधकाम परवानग्या देताना या कर्मचाऱ्याकडून गोंधळ घातला जातो. त्यामुळे शहराचे नियोजन कोलमडून पडले आहे, अशी माहिती विकासक, वास्तुविशारदांकडून देण्यात येते. आयुक्त या कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतात याकडे पालिका अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.