कुशीवली धरणाच्या हालचालींना वेग

ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची रखडपट्टी सुरू असतानाच अंबरनाथ तालुक्याच्या मलंगगड डोंगररांगेत प्रस्तावित असलेल्या कुशीवली धरणाच्या उभारणीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत.

९.६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार; अंबरनाथ तालुक्यात प्रकल्प उभारणी

अंबरनाथ : ठाणे जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची रखडपट्टी सुरू असतानाच अंबरनाथ तालुक्याच्या मलंगगड डोंगररांगेत प्रस्तावित असलेल्या कुशीवली धरणाच्या उभारणीबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. सुमारे ९.६ दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्याची क्षमता या धरणाची असणार आहे.

अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर गेल्या काही वर्षांत वेगाने सुरू असणाऱ्या नागरीकरणामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. ती मागणी पूर्ण करण्यासाठी या धरणाचा फायदा होणार आहे. या धरणाच्या भूसंपादनात कोणत्याही गावाचे विस्थापन होणार नसल्याने प्रकल्प वेगाने मार्गी लागण्याची आशा आहे. जिल्ह्यात पाण्याची मागणी आणि पुरवठा यात प्रचंड तफावत असून जिल्ह्याची लोकसंख्याही वेगाने वाढते आहे.

गेल्या महिन्यात जलसंपदा विभागाच्या मुख्यालयात झालेल्या सिंचन आढावा बैठकीत जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांची रखडपट्टी सुरू असल्याचे समोर आले होते. त्यामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तातडीने जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली शीघ्र कृती दलाची स्थापना केली होती. आता अंबरनाथ तालुक्यात प्रस्तावित असलेल्या कुशीवली धरणाच्या निर्मितीला वेग आला आहे.

दशकभरापूर्वी जिल्ह्यातील काळू आणि शाई धरणासोबतच अंबरनाथ तालुक्यातील कुशीवली धरणाचे काम हाती घेण्यात आले होते. मलंग डोंगररांगांमध्ये कुशीवली येथे हे धरण प्रस्तावित असून त्यासाठी वन विभाग आणि काही खासगी जागा अधिग्रहित कराव्या लागणार होत्या. सध्याच्या घडीला उल्हासनगर उपविभागीय अधिकारी जयराज कारभारी यांच्या माध्यमातून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकल्पासाठी एकूण ९० हेक्टर जागा लागणार असून त्यातील वन विभागाच्या अखत्यारीतील ३६ हेक्टर जागेसाठी यापूर्वीच जलसंपदा विभागाने ४ कोटी ७० लाख रुपये अदा केले आहेत. मात्र तांत्रिक घोळामुळे वन विभागाची अंतिम मान्यता मिळू शकलेली नाही. त्याच वेळी खासगी भूसंपादन प्रक्रियेचा ७० टक्के भाग पूर्ण झाला असून त्यामुळे धरणाच्या उभारणीला गती मिळण्याची आशा जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकल्पासाठी कोणत्याही गावाचे विस्थापन होणार नसल्याने प्रकल्प वेगाने मार्गी लागण्याची आशा आहे.

तांत्रिक घोळ सोडवण्याचा प्रयत्न

धरणाच्या जागेच्या मोबदल्यात वन विभागाला अंबरनाथ तालुक्यातील पर्यायी जागा देण्यात आली. मात्र तांत्रिक घोळामुळे ही जागा जिल्हा प्रशासनाने थेट एमएमआरडीएला वळती केली. त्यामुळे वन विभागाने धरणाला मान्यता दिली नाही. या तांत्रिक घोळावर तोडगा काढण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. हा घोळ मिटल्यास धरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकणार आहे.

या भागाला फायदा अंबरनाथ आणि कल्याण तालुक्याच्या वेशीवर मोठय़ा प्रमाणावर नागरीकरण होते आहे. या भागाची तहान भागवण्यासाठी ठोस स्रोत नाहीत. कुशीवलीच्या माध्यमातून ही पाण्याची मागणी पूर्ण करता येणार आहे. या धरणातून ९.६ दशलक्ष घनमीटर पाणी उपलब्ध होणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accelerate movement kushiwali dam ysh

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या