दुचाकी चालकांच्या अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढते

ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत १५८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे.

३१ ऑक्टोबपर्यंत १५८ जणांचा मृत्यू 

किशोर कोकणे

ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत १५८ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. दोन दिवसांआड एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. 

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे ते बदलापूर आणि भिवंडी ही शहरे येतात. भिवंडी हे गोदामांचे शहर आहे. उरण जेएनपीटीहून सुटणारी हजारो वाहने ठाणे, मुंब्रा आणि भिवंडी शहरातून येथील गोदामाकडे येत असतात. गुजरातच्या दिशेने जाणारी अवजड वाहनेही घोडबंदर मार्गाने प्रवास करतात. मुंबई नाशिक महामार्गाची वाहतूकही ठाणे शहरातून होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांचे जाळे आयुक्तालय क्षेत्रात आहे.

करोनाकाळात सार्वजनिक वाहतूक सेवा बराच काळ बंद असल्याने या कालावधीत खासगी वाहनांनी प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली. यामध्ये दुचाकी चालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे रस्ते मार्गावर वाहनांचा भार वाढला असताना अपघातांचे प्रमाणही वाढू लागले आहे.

१ जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत ७२९ अपघातांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १५८ जणांना अपघाती मृत्यू झाला आहे. सरासरी दोन दिवसांआड एकाचा अपघातामध्ये मृत्यू होत आहे. या वर्षी झालेल्या अपघातात ३४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. उर्वरित अपघात हे किरकोळ स्वरूपातील आहे.

अपघातांची कारणे

खराब रस्ते, मागून येणाऱ्या वाहनाची धडक बसून वाहनावरील नियंत्रण सुटणे यामुळे अपघात घडत असतात. अवजड वाहनांमुळे धडक बसल्याने अपघात घडण्याचे प्रमाण अधिक आहे. अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वाहन चालकांमध्ये दुचाकी चालक आणि पादचाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.

अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेले ७० टक्के हे दुचाकी चालक आणि पादचारी आहेत. हेल्मेट परिधान न केल्याने दुचाकी चालकांच्या डोक्याला इजा होऊन अनेकांचा मृत्यू ओढावला आहे.

बाळासाहेब पाटील, उपायुक्त, ठाणे वाहतूक नियंत्रण शाखा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Accidental deaths two wheelers rise ysh