tvlog03पुणे आणि ठाण्याप्रमाणेच डोंबिवली हा महाराष्ट्राच्या कला-साहित्य आणि सांस्कृतिक परंपरांचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. नोकरी-व्यवसायाच्या धबडग्यात व्यस्त असूनही येथील नागरिकांनी अतिशय कसोशीने आपल्यातले रसिकपणे जपले आहे. साधारण साडेसहाशे वर्षांपूर्वीच्या एका शीलालेखात डोंबिवलीचा उल्लेख आढळतो. अलीकडच्या काळात गुढी पाडव्याची नववर्ष स्वागतयात्रा अथवा फडके रोडवरील सार्वजनिक दिवाळीमुळे डोंबिवलीने महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले. नव्या सांस्कृतिक परंपरा रुजविल्या. डोंबिवलीच्या या सांस्कृतिक श्रीमंतीत येथील समृद्ध ग्रंथालयांनी मोलाची भर घातली आहे. महापालिकेचे आचार्य अत्रे ग्रंथालय हे त्यांपैकी एक.     
ग्रामपंचायतीचे सरपंच असलेल्या कै. धनश्याम महादेव गुप्ते यांनी पुढाकार घेऊन १९४९ मध्ये डोंबिवली पंचायतीचे एक मोफत वाचनालय सुरू केले. पुढे १९५० मध्ये त्याला ग्रंथालय जोडले गेले, तेव्हापासून आतापर्यंत डोंबिवलीत वाचनसंस्कृती जपण्याचे कार्य हे ग्रंथालय करत आहे. एकूण ५२ विभागांत  ५० हजार पुस्तके या ग्रंथालयात आहेत. ग्रंथालयात अतिशय नेटक्या पद्धतीने ही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे वा वाङ्मयशोभेत आपण हरवून जातो. पुस्तकांसाठी २० रुपये तर मासिकांसाठी २५ रुपये मासिक वर्गणी आहे. बाल विभागासाठी अवघी पाच रुपये मासिक वर्गणी असल्याने ग्रंथालयात वाचकांची पुस्तके, मासिकांसाठी गर्दी पाहायला मिळते. कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, राज्यशास्त्र, कायदा, अध्यात्म असे वेगवेगळ्या प्रकारच्या पुस्तकांच्या विभागात जगभरातील अनेक नामवंत साहित्यिक, लेखकांची पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत.
संदर्भ विभाग :
ग्रंथालयात असणारा संदर्भग्रंथ विभाग आपला लक्ष वेधून घेतो. संस्कृतीकोश, बाल संस्कृतीकोश, विश्वकोश यांचे अनेक खंड, बाराखडीनुसार लहान मुलांच्या विश्वातून जगाची माहिती देणारे २१ खंड संदर्भासाठी या विभागात आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रांत संशोधन करणाऱ्या व्यक्तींना, लहान मुलांना प्रकल्पासाठी किंवा कोणत्याही क्षेत्रातील इतिहास जाणून घेऊ  इच्छिणाऱ्यांसाठी हा विभाग अतिशय उपयुक्त आहे. त्यात ६५० संदर्भग्रंथ आहेत.
स्वातंत्र्योत्तर काळापासून साहित्याची परंपरा जपत असल्याने या ग्रंथालयातील काही पुस्तके अतिशय जुनी आहेत. ज्यांची पाने अतिशय जीर्ण झालेली असली तरी आजही त्यांचे वाचनमूल्य आहे. आजच्या काळातही अशा जुन्या दुर्मीळ पुस्तकांचा वाचकांना उपयोग व्हावा यासाठी दुर्मीळ पुस्तकांचा स्वतंत्र विभाग करून त्यात ती जतन करून ठेवलेली आहेत.
दुर्मीळ पुस्तके :
१९६६ मध्ये डोंबिवली शहर इतिहास मंडळाने प्रसिद्ध केलेला ‘डोंबिवली शहराचा इतिहास’ हा दुर्मीळ ग्रंथ संग्रहालयात आहे. डोंबिवलीतील अनेक मातब्बर मंडळींचे त्यात लेखन आहे. डोंबिवली शहराविषयी माहिती घेऊ  इच्छिणाऱ्यांसाठी या दुर्मीळ पुस्तकाचा आजही उपयोग होऊ  शकतो. भावी पिढीला या ज्ञानाचा उपयोग व्हावा या उद्देशातून पुस्तकाची निर्मिती झाली आणि त्या काळी त्याचे मूल्य एक रुपया होते. याशिवाय १९४६ मध्ये प्रकाशित झालेले नारायण गणेश गोरे यांचा अनुवाद असलेले ‘द्विखंड हिंदुस्थान’, १९४८ चे प्रबोधनकार ठाकरे यांचे ‘जुन्या आठवणी’, १९५० मधील दु. का. संत यांचे ‘साहित्य आणि संस्कृती’,मनोहर केळकर लिखित १९४६ मधील ‘उपायन’ हे निबंध, तर पं. दिनदयाळजी उपाध्याय यांचे विचारप्रवर्तक लेख असलेले ‘राष्ट्रचिंतन’ यांसारखी अनेक दुर्मीळ पुस्तके या विभागात पाहायला मिळतात.
ग्रंथालय म्हटले की पुस्तके, ग्रंथ, मासिके, वर्तमानपत्रे यांचा भरणा तिथे आलाच, परंतु या सर्व पुस्तकांचे जतन करण्यात, अगदी जुनी पुस्तके वाचकांना वेळीच उपलब्ध करून देण्यात ग्रंथालयाचे ग्रंथपाल आणि त्यांच्या कर्मचारीवर्गाची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रंथालयात ५० हजारहून अधिक पुस्तके असूनही ती सुटसुटीतपणे, नेटक्यापणाने मांडून ठेवली आहेत. वाचकांना हवे असलेले पुस्तक तत्परतेने उपलब्ध करून दिले जाते. त्याचे श्रेय निश्चितच येथील कर्मचाऱ्यांना जाते. गेली २५ वर्षे ग्रंथपालाची जबाबदारी सांभाळणारे अनिल भालेराव ग्रंथालयाविषयी अतिशय उत्सुकतेने बोलतात. ग्रंथालयातर्फे काही वर्षे  पु. भा. भावे व्याख्यानमाला आयोजित केली जात होती. डॉ. प्रकाश आमटे, डॉ. विठ्ठल कामत, शरद पोंक्षे, नीला सत्यनारायण, प्रभाकर पणशीकर अशी अनेक मान्यवर मंडळी व्याख्यानासाठी ग्रंथालयात येऊन गेली. कालांतराने काही कारणास्तव ही व्याख्यानमाला बंद झाली असली तरी त्या वेळी साहित्याच्या प्रेमापोटी सर्व कर्मचारी, इच्छुकांनी एकत्र येऊन केलेल्या त्या उपक्रमाच्या आठवणी आजही स्मरणात आहेत, असे ते आवर्जून सांगतात.
अतिशय समृद्ध संदर्भ विभागामुळे हे वाचनालय आम्हा डोंबिवलीकरांसाठी मोठी पर्वणीच आहे. या ग्रंथालयाशी आमची नाळ जोडली गेली आहे, असे मत येथे नियमित येणाऱ्या लेखिका मीना गोडखिंडी यांनी सांगितले.  
किन्नरी जाधव

आचार्य अत्रे ग्रंथालय-डोंबिवली
पत्ता- आचार्य अत्रे ग्रंथालय, महानगरपालिका विभागीय कार्यालय, बाजीप्रभू चौक, डोंबिवली (पूर्व)