कल्याण : कल्याण महापालिकेजवळील आचार्य अत्रे रंगमंदिर हे कल्याण-डोंबिवलीसह बदलापूर, अंबरनाथ आणि परिसरातील नाट्यरसिकांसाठी प्रमुख सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते. या रंगमंदिरातील उपहारगृह गेल्या काही आठवड्यांपासून बंद आहे. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असून मध्यंतरात बाहेर जाऊन पाणी, खाद्यपदार्थ आणावे लागत आहे. विशेष म्हणजे, उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर नवीन ठेका अद्याप कोणालाही देण्यात आला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिरात ‘ऑल द बेस्ट’, ‘सही रे सही’, ‘जाऊ बाई जोरात’, ‘पुरुष’ यांसारख्या लोकप्रिय व्यावसायिक नाटकांपासून ते विविध सांस्कृतिक कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक प्रयोगाला मोठी गर्दी होते. बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, कल्याण परिसरातूनही अनेक नाट्यप्रेमी कुटुंबासह येथे येतात. यामुळे बऱ्याचदा प्रयोग हाऊसफुल होत असतात. मात्र, प्रेक्षकांसाठी चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, अल्पोपहार किंवा खाद्यपदार्थ उपलब्ध करून देणारे उपहारगृह बंद असल्याने गैरसोय होत आहे.
विशेषतः नाटकांच्या मध्यंतरात ही समस्या जाणवत असल्याने प्रेक्षकांना नाट्यगृहाबाहेर जाऊन खाद्यपदार्थ किंवा पिण्याचे पाणी आणावे लागते. तर रंगमंदिराच्या परिसरातही सुविधा उपलब्ध नसल्याने दूर जावे लागत असल्याची तक्रार प्रेक्षकांकडून होत आहे. दुपारच्या किंवा सायंकाळच्या प्रयोगासाठी दोन ते अडीच तास रंगमंदिरात असतात. यामुळे किमान सोयी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी प्रेक्षकांकडून होत आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे ही व्यवस्थापनाची जबाबदारी असून, उपहारगृहासाठी लवकरात लवकर नवीन ठेकेदाराची नियुक्ती करून ही सेवा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रेक्षकांकडून होत आहे.
कलाकार, अन्य कर्मचाऱ्यांचीही गैरसोय कलाकारांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. सलग प्रयोग, रंगीत तालीम किंवा कार्यक्रमांदरम्यान भूक लागल्यास कलाकारांनाही बाहेरून खाद्यपदार्थ मागवावे लागतात किंवा सहाय्यकांना रंगमंदिराबाहेर पाठवावे लागते. त्यामुळे कलाकार आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे.
नाट्यगृहातील उपहारगृह चालविणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. यामुळे सध्या उपहारगृह बंद आहे. याबाबत प्रक्रिया सुरू आहे. लवकरच हे उपहारगृह प्रेक्षकांच्या सेवेत येईल. – माणिक शिंदे, उप व्यवस्थापक, आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण
रविवारी ‘ऑल द बेस्ट’ नाटक पाहण्यासाठी गेलो होतो. नाटक हाऊसफुल होते. मात्र मध्यंतरावेळी उपहारगृह बंद असल्याचे कळले. पाऊस असताना देखील बाहेर जाऊन कुटुंबासाठी पाणी आणि खाद्यपदार्थ आणावे लागले. – भरत देशमुख, प्रेक्षक
काही आठवड्यापूर्वी किरण माने शो या कार्यक्रमाला गेलो होतो. त्यावेळी देखील उपहारगृह बंद होते. यामुळे प्रेक्षकांची मोठी गैरसोय होत असल्याने उपहारगृह तातडीने सुरू करावे. – संजय साळुंके, प्रेक्षक
