Premium

शिळफाटा रस्त्यावर ३०० बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई, ७५ हजाराचा दंड वसूल

३३० वाहन चालकांवरील कारवाईतून ७५ हजाराचा दंड वसूल केला आहे, असे कल्याण मधील कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

Traffic police action against reckless drivers
शिळफाटा रस्त्यावरील बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांची कारवाई.

कल्याण : कल्याण-शिळफाटा रस्त्यावरील वाहन चालकांच्या बेशिस्तीला आळा घालण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने पत्रीपूल ते पलावा चौक, काटई-बदलापूर रस्ता भागात विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू केली आहे. बेशिस्त दुचाकी, चारचाकी वाहन चालकांवर घटनास्थळीच दंडात्मक कारवाई केली जात आहे. ३३० वाहन चालकांवरील कारवाईतून ७५ हजाराचा दंड वसूल केला आहे, असे कल्याण मधील कोळसेवाडी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिळफाटा रस्त्यावर भरधाव वेगात, उलट मार्गिकेतून वाहने चालविणाऱ्या संख्या वाढली आहे. या रस्त्यावर अपघातांची संख्या वाढत आहे. शीळ रस्त्यावरील गाव भागातून येणारे वाहतुकीला अडथळा ठरणारे ३० हून अधिकचे पोहच रस्ते बंद करण्यात आले आहेत. अनेक दुचाकी, मोटार चालक वळण रस्त्याऐवजी उलट मार्गिकेतून येऊन इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतात. अशा चालकांमुळे नियमित मार्गिकेतून येणाऱ्या वाहनांना अडथळा होत आहे. उलट मार्गिकेतून जाणाऱ्या वाहन चालकाच्या चुकीमुळे अनेक वेळा शिळफाटा रस्त्यावर अपघात होत आहेत, असे वाहतूक अधिकारी क्षीरसागर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> डोंबिवली पूर्वेतील पाटकर प्लाझामधील वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्याच्या हालचाली

पलावा चौक, रिव्हरवुड पार्क, मानपाडा रस्ता भागातून उलट मार्गिकेतून येणाऱ्या वाहन चालकांची संख्या अधिक आहे. अशा वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्याने कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. आतापर्यंत पत्रीपूल ते शिळफाटा रस्त्यावर विना शिरस्त्राण घातलेल्या १९० दुचाकी स्वार, उलट मार्गिकेतून येणाऱ्या ७० वाहन चालक, रिक्षेत चालकाच्या आसनाजवळ बसवून प्रवास करणाऱ्या ३० रिक्षा चालक, सुरक्षित पट्टा न लावणाऱ्या ७० प्रवाशांवर, काळ्या काचा लावून वाहन चालविणाऱ्या १० वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे, असे क्षीरसागर यांनी सांगितले. या कारवाईतून ७४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

“शिळफाटा रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करुन वाहने चालविणाऱ्यांची संख्या वाढल्याने या रस्त्यावर विशेष वाहन तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. दोषी वाहन चालकावर दंडात्मक कारवाई केली जाते.” – रवींद्र क्षीरसागर वरिष्ठ पोलीस निरीक्षक, कोळसेवाडी, कल्याण.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Action against 300 unruly drivers on shilphata road ysh

First published on: 30-05-2023 at 14:59 IST
Next Story
डोंबिवली पूर्वेतील पाटकर प्लाझामधील वाहनतळ भाडेपट्ट्याने देण्याच्या हालचाली