ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा, कोपर आणि कोन खाडी परिसरातून अवैधरित्या वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात जिल्हा प्रशासन आणि रेल्वे प्रशासनाने शुक्रवारी कारवाई केली. या कारवाई मध्ये वाळू माफियांचे सुमारे ३० ते ५० लाख रुपयांचे वाळू उपसा करणारे साहित्य नष्ट करण्यात आले. तसेच त्या ठिकाणी उपसा करून ठेवण्यात आलेली १० ब्रास वाळूत मातीमिश्रित करून तिची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील नदी आणि खाडी पात्रात वाळू माफियांकडून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा करण्यात येतो. मागील काही महिन्यांपासून या माफियांकडून नदी आणि खाडीतून जाणाऱ्या रेल्वे पुलांच्या तळाशी वाळू उपसा सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. यामुळे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाळू माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी ठाणे महसूल विभाग, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि रेल्वे प्रशासन यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मुंब्रा, कोपर आणि कोन खाडी लगत असलेल्या रेल्वे रुळांगत ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये वाळू माफियांचे ११ संक्शन पंप हे नादुरुस्त करण्यात आले तर २ पंप गॅस कटरच्या सहाय्याने तोडण्यात आले. तसेच अवैधरित्या उपसा केलेली वाळूचा साठा करण्यासाठी माफियांकडून उभारण्यात आलेल्या १९ कुंड्या देखील नष्ट करण्यात आला. तर कुंड्यांमध्ये साठवलेल्या वाळूत मातीमिश्रित करून वाळू पुन्हा खाडी पात्रात टाकण्यात आली. ओहोटी आणि भरतीचे नियोजन करत जिल्हा प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Action against illegal sand dredgers thane lakh materials of sand mafia destroyed amy
First published on: 27-05-2022 at 23:58 IST