कडोंमपा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
कल्याणमधील मौज चिकणघर येथील सात लाख चौरस मीटर क्षेत्राच्या १२४ कोटींच्या ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) घोटाळा प्रकरणाची कार्यवाही येत्या एक महिन्यात पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन शासनातर्फे विधान परिषद सभापतींना देण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील मौजे चिकणघर येथील ७२ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ‘टीडीआर’ घोटाळा प्रकरणाची गेल्या दीड वर्षांपूर्वी आमदार अ‍ॅड. अनिल परब यांनी मुख्यमंत्री, नगरविकास विभागाकडे तक्रार केली होती. विधान परिषदेच्या तीन वेळच्या अधिवेशनांमध्ये हा प्रश्न उपस्थित करून या घोटाळ्याची पाळेमुळे खोदून काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शासनाच्या विविध समित्यांनी या ‘टीडीआर’ घोटाळ्यात तथ्य असल्याचे अहवाल शासनाला सादर केले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य दिवसेंदिवस वाढत आहे. टीडीआर घोटाळ्याचे चौकशी अहवाल येऊनही नगरविकास विभाग, कल्याण-डोंबिवली पालिका प्रशासन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करीत नाही. या प्रकरणी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस नगरविकास प्रधान सचिव डॉ. नितीन करीर, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत, नगररचना संचालक व इतर अधिकारी उपस्थित होते.
या टीडीआर घोटाळ्याचा एका महिन्यात सोक्षमोक्ष लावा. चिकणघर येथील क्षेत्रावरून पुन्हा टीडीआर देण्यात येणार नाही आणि जैसे थे परिस्थिती राहील याची काळजी घ्यावी, असे आदेश सभापतींनी शासकीय, पालिका अधिकाऱ्यांना दिले. या टीडीआर घोटाळ्यात कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी आयुक्त व विद्यमान पालिका उपायुक्त रामनाथ सोनवणे, साहाय्यक संचालक नगररचनाकार चंद्र प्रकाश सिंग, रघुवीर शेळके आणि शशिम केदार यांचा सहभाग असल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. सिंग यांना नगरविकास विभागाने कारवाईची नोटीस पाठवून त्यांची विभागीय चौकशी सुरू केली आहे. तर महापालिका अधिकाऱ्यांवर आयुक्त ई. रवींद्रन यांनी कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत. या सर्व अधिकाऱ्यांचे खुलासे पालिकेला प्राप्त झाले आहेत.
पालिका चौकशी अधिकाऱ्याच्या शोधात
महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांची चौकशी करण्यासाठी अद्याप चौकशी अधिकारीच नियुक्त केले नसल्याची बाब बैठकीत उघड झाली. घरत यांनी महिनाभरात ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. शासन, पालिकेने दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी आग्रही मागणी आमदार परब यांनी केली आहे.

टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू
खास प्रतिनिधी, ठाणे<br />मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात मंगळवारी रात्री एका टँकरच्या धडकेत दीपक आत्माराम नमसुले (२९) या मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर टँकरचालक पळून गेला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ठाणे येथील पाचपखाडी भागात दीपक नमसुले हा राहात होता. तसेच शीळ-फाटा परिसरात तो कामाला होता. मंगळवारी रात्री मोटारसायकलीवरून तो घरी परतत होता. त्यावेळी भरधाव टँकरने त्याला धडक दिली. या धडकेमुळे टँकरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाला. टँकरचालक पळून गेला आहे.

चंद्रशेखर टिळक यांचे व्याख्यान
कल्याण : बिर्ला महाविद्यालयात ४ मार्च रोजी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांचे अर्थसंकल्प विषयावर व्याख्यान होणार आहे. या वेळी प्राप्तिकर विभागाचे सहआयुक्त मनीषकुमार सिंग, प्राचार्य डॉ. नरेशचंद्र उपस्थित राहणार आहेत.