पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत.

महापालिका कर्मचाऱ्यांनी गुरुवारी ठाण्यात पोलीस बंदोबस्तात फेरीवाल्यांवर कारवाई केली.

स्थानक परिसर, घोडबंदर भागात पालिकेकडून दिवसभर कारवाईचे नियोजन; तीन पथकांची नेमणूक; दोन पाळय़ांमध्ये काम

ठाणे : महापालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर जागे झालेल्या प्रशासनाने फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन आखले आहे. यानुसार फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडलेल्या ठाणे स्थानक परिसर आणि घोडबंदर भागात पोलीस बंदोबस्तात पालिकेच्या पथकाकडून दिवसभर कारवाई केली जाणार आहे. यासाठी तीन पथकांची नेमणूक करण्यात आली असून सकाळ आणि सायंकाळ अशा दोन पाळ्यांत काम करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील रस्ते आणि पदपथ फेरीवाल्यांनी गिळंकृत केले आहेत. सर्वाधिक वर्दळीचा परिसर असलेल्या ठाणे स्थानक परिसर, सॅटीस पूल, गोखले रोड आणि मुख्य बाजारपेठेत फेरीवाल्यांची संख्या वाढली आहे. नवे ठाणे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घोडबंदर परिसरातील रस्त्यांवरही फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. याशिवाय, वागळे इस्टेट, वर्तकनगर, कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांतही अशीच काहीशी परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने फेरीवाल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नियोजन आखले आहे.

या नव्या नियोजनानुसार दोन ते तीन प्रभाग समित्यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे. ठाणे स्थानक परिसर, सॅटीस पूल, गोखले रोड, मुख्य बाजारपेठ आणि ठाणे पूर्व भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत. त्यासाठी  नौपाडा-कोपरी प्रभाग समितीला लोकमान्य-सावकरनगर आणि उथळसर प्रभाग समितीमधील कर्मचाऱ्यांचे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. एका पथकामध्ये १५ ते २० जण आहेत. याशिवाय, पोलीस आणि महापालिका सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. सकाळी ७ ते दुपारी ३ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या वेळेत पथकातील कर्मचाऱ्यांना कारवाईची जबाबदारी देण्यात आली आहे.

ठाणे स्थानक, सॅटीस पूल आणि गोखले रोड या भागांत एक पथक नेमण्यात आले आहे तर, उर्वरित दोन पथके मुख्य बाजारपेठ आणि ठाणे पूर्व भागात नेमण्यात आली आहेत. अशाच प्रकारे घोडबंदर भागासाठी माजिवाडा मानपाडा प्रभाग समितीला वर्तकनगर आणि वागळे प्रभाग समितीमधील अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात आले आहे. या पथकांनी गुरुवार सकाळपासून फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली असून या कारवाईत फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले.

आव्हाडांची पालिका प्रशासनावर टीका

प्रशासनाचा दरारा आणि दहशत जेव्हा संपते, तेव्हाच अशा अधिकाऱ्यांवर हल्ल्याच्या घटना घडतात, असे सांगत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पालिका अधिकाऱ्यांचे कान टोचले. तसेच फेरिवाल्यांविरोधात तक्रारी करण्यापेक्षा त्यांच्याकडून भाजी खरेदी करणे बंद करून भाजीमंडईतूनच भाजी खरेदी करा, असा सल्लाही त्यांनी ठाणेकरांना दिला आहे.

दोन ते तीन प्रभाग समित्यांचे एक पथक तयार करण्यात आले असून त्यांच्यामार्फत ठाणे स्थानक परिसरासह नौपाडा-कोपरी भागात आणि घोडबंदर भागात कारवाई सुरू करण्यात आली आहे. कळवा, मुंब्रा आणि दिवा भागांतही एका पथकामार्फत कारवाई सुरू असून ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे.

-अश्विनी वाघमळे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, ठामपा

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action against peddlers in police custody ssh

ताज्या बातम्या