लोकसत्ता खास प्रतिनिधी डोंबिवली : लोकलमधील अपंगांच्या विशेष राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या सात सामान्य प्रवाशांवर गुरुवारी डोंबिवली लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बळाच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही तपासणी मोहीम यापुढे सुरूच राहणार आहे, असे डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांनी सांगितले. लोकलच्या वाढत्या गर्दीला कंटाळून अलीकडे अनेक सामान्य प्रवासी गर्दीच्या वेळेत तिकीट तपासणीस येत नाहीत. या संधीचा गैरफायदा घेऊन अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात. अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने अपंगांना बसण्यास किंवा डब्यात उभे राहण्यास जागा मिळत नाही. अनेक प्रवासी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर, घाटकोपर भागातून अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात. त्यामुळे ठाणे पुढील रेल्वे स्थानकातील अपंगांना अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांच्या गर्दीमुळे चढता येत नाही. आणखी वाचा-घोडबंदर भागातील खड्डे, कोंडीविरोधात नागरिक एकवटले बदलापूर, टिटवाळा, डोंबिवली, कल्याण भागातील अनेक अपंग नोकरी, व्यवसायासाठी मुंबई परिसरात जातात. काही असाध्य व्याधी असणारे रुग्ण याच डब्यातून मुंबईचा प्रवास करून मुंबईतील रुग्णालयांमध्ये जातात. त्यांनाही अपंगांच्या डब्यात अलीकडे जागा मिळत नाही. लोकल मधील अपंगांच्या डब्यातील सामान्य प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे, होणाऱ्या त्रासामुळे अनेक अपंग प्रवाशांनी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या. दिवा, डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकात उतरणारे अनेक सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करतात, अशा तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेऊन डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे, रेल्वे सुरक्षा बळाचे पोलीस उपनिरीक्षक मनोहर यांनी गुरूवारी डोंबिवली रेल्वे स्थानकात मुंबईकडून येणाऱ्या आणि जाणाऱ्या लोकल डब्यांमधील अपंगांच्या डब्यांमधील प्रवाशांची शोध मोहीम राबवली. त्यावेळी या तपासणी पथकाला सात सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकाने त्यांना तात्काळ अपंगांच्या डब्यातून उतरवून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली. आणखी वाचा-विश्लेषण: ठाणे खड्डे आणि कोंडीमुक्त कसे होईल? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती किती सुधारली? गुरुवारपासून सुरू असलेल्या या कारवाईमुळे सामान्य प्रवासी अपंगांच्या डब्यातून प्रवास करण्याचे टाळत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. सामान्य प्रवाशांनी अपंगांसाठी राखीव डब्यातून प्रवास करू नये असे आवाहन उंदरे यांनी केले आहे.