बेकायदा बांधकामांवर कारवाईचा धडाका!

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पथकाने बुधवारी ही जरब मोडून काढली.

शास्त्रीनगर परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या बांधकामांवर बुधवारी महापालिकेने कारवाई केली.

शास्त्रीनगर, कोपरी परिसरांत पालिकेची मोहीम; तर शिळफाटय़ावरील बांधकामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा बुलडोझर

नव्या ठाण्यातील बेकायदा बांधकामांचे आगार समजल्या जाणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील राजकीय दंडेलशाहीला झुगारून महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने या भागातील सुमारे ३५०हून अधिक बांधकामे जेमतेम तीन तासांच्या कारवाईत जमीनदोस्त केली. शास्त्रीनगर ते हत्तीपुल या रस्त्याच्या रुंदीकरणात आड येणाऱ्या बांधकामांवर कारवाई झाल्याने या रस्त्याच्या पूर्णत्वास येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाण्यातील रिपब्लिकन पक्षातील  वजनदार इंदिसे कुटुंबाचे या भागावर वर्चस्व असल्याने या ठिकाणच्या अतिक्रमणांवर वर्षांनुवर्षे कारवाई झाली नव्हती. मात्र, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पथकाने बुधवारी ही जरब मोडून काढली. एकीकडे शास्त्रीनगरमध्ये अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू असतानाच कोपरी परिसरातील रस्त्याच्या रुंदीकरणाआड येणाऱ्या अडीचशे बांधकामांवरही पालिकेने बुधवारी कारवाई केली. त्याच वेळी ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तळोजे-शिळफाटा मार्गावरील अतिक्रमणे हटवून कारवाईचा धडाका सुरूच ठेवला.

महिनाभरापूर्वी याच रस्त्याच्या रुंदीकरणासाठी सर्वेक्षणाचे काम सुरू असताना महापालिकेच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. त्यामुळे बुधवारी सकाळी पोलिसांच्या अभूतपूर्व बंदोबस्तात पालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांचा फौजफाटा शास्त्रीनगर परिसरात पोहोचला. घरांवर बुलडोझर फिरवण्याआधी महापालिकेच्या पथकातील अधिकाऱ्यांकडून रहिवाशांना रेंटल योजनेतील घरांच्या चाव्या सुपूर्द केल्या जात होत्या. त्यानंतरच घरे पाडली जात होती. त्यामुळे रहिवाशांकडून कोणताही विरोध झाला नाही. या कारवाईसाठी महापालिकेने तीन उपायुक्तांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली होती. जेसीबी, पोकलेन आणि कर्मचाऱ्यांमार्फत ही बांधकामे हटविण्याची कारवाई सुरू होती. या कारवाईत जवळपास ३८२ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्यामध्ये २८२ निवासी, ४४ निवासी आणि व्यावसायिक गाळे आणि ५६ व्यावसायिक गाळ्यांचा समावेश आहे. तसेच या रस्त्याच्या कामामध्ये दोन इमारती बाधित होणार असून त्याही कारवाईदरम्यान पाडण्यात येणार आहेत. 

लोकमान्यनगर आणि शास्त्रीनगर या दोन्ही विभागांना जोडण्यासाठी हत्तीपूल हा अंतर्गत मार्ग म्हणून परिचित आहे. वर्तकनगर नाक्यावर होणाऱ्या कोंडीत अडकून पडावे लागू नये म्हणून लोकमान्यनगर तसेच अन्य भागांत जाण्यासाठी अनेकजण हत्तीपूल मार्गाचा वापर करतात. या रस्त्याच्या दुर्तफा बेकायदा बांधकामांचा विळखा पडल्यामुळे हा रस्ता अरुंद झाला होता. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. या पाश्र्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शास्त्रीनगर ते हत्तीपूल या रस्त्याच्या रुंदीकरणाचा निर्णय घेतला. या रुंदीकरणाच्या कामासाठी बुधवारपासून रस्त्यालगतची बेकायदा बांधकामे तसेच व्यावसायिक गाळे हटविण्याची कारवाई करण्यात आली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Action on illegal construction

ताज्या बातम्या