बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

कल्याण-डोंबिवलीत तीन रिक्षा जप्त; परवाने रद्द करण्याचा निर्णय

या वेळी ४९ रिक्षाचालकांमधील बहुतेक रिक्षाचालकांकडे परवाने आढळून आले नाहीत. त्यांनी खाकी गणवेश परिधान केला नव्हता. नावपट्टी लावली नव्हती. काही रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्याचे आढळून आले.

कल्याण-डोंबिवलीत तीन रिक्षा जप्त; परवाने रद्द करण्याचा निर्णय

कल्याण, डोंबिवलीत बेशिस्त, मुजोर रिक्षाचालकांची दंडेली पुन्हा वाढली आहे. वाहतुकीचे नियम पायदळी तुडवून पादचारी, प्रवाशांना त्रास दिला जात आहे. वाहनतळ सोडून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या वाढत्या तक्रारी कल्याणच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे आल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेऊन ‘आरटीओ’ आणि वाहतूक विभागाने कल्याण, डोंबिवलीत बुधवारी संयुक्त कारवाई करून ४९ बेशिस्त रिक्षाचालकांवर गुन्हे दाखल केले. या कारवाईत तीन रिक्षा जप्त करण्यात आल्या.

रिक्षेत बसलेल्या तरुणी, महिलांची छेड करणे, त्यांचे अपहरण करणे, प्रवाशांशी भाडय़ावरून वाद घालून त्यांना मारहाण करणे, असे प्रकार कल्याण-डोंबिवलीत वाढले आहेत. त्यामुळे कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे, साहाय्यक पोलीस आयुक्त आव्हाड, साहाय्यक अधिकारी आय. एम. मासुमदार यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक सचिन कोतापकर, सूर्यकांत गंभीर, जयेश देवरे यांच्या पथकाने शहरांमधील मुख्य, गल्लीबोळातील रिक्षा वाहनतळांवर अचानक तपासणी केली.

या वेळी ४९ रिक्षाचालकांमधील बहुतेक रिक्षाचालकांकडे परवाने आढळून आले नाहीत. त्यांनी खाकी गणवेश परिधान केला नव्हता. नावपट्टी लावली नव्हती. काही रिक्षाचालकांनी भाडे नाकारल्याचे आढळून आले. त्या चालकांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात आली. तीन रिक्षाचालक कोणतेही कागदपत्र दाखवू शकले नाहीत, त्यांच्या रिक्षा जप्त करण्यात आल्या, असे संजय ससाणे यांनी सांगितले. या कारवाईत लाड, धोंडे, भामरे, शेरेकर हे अधिकारी सहभागी झाले होते. अनेक रिक्षाचालक ‘आरटीओ’चा परवाना न घेता भंगार रिक्षा चालवत असल्याच्या तक्रारी आहेत. असे रिक्षाचालक ज्या वाहनतळांवरून व्यवसाय करीत आहेत, त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली आहे. हे चालक पहाटे, रात्री व्यवसाय करीत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही सापळा लावून जाळ्यात अडकविण्याचे प्रयत्न आहेत. असे बेशिस्त रिक्षाचालक सापडले तर त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाणार असल्याचेही या वेळी ससाणे यांनी सांगितले.

सतत नियमभंग केल्यास परवाना निलंबन

रिक्षाचालकांनी नियम पाळून वाहतूक करावी.वाहतुकीला अडथळा होईल, अशा रिक्षा उभ्या करू नयेत. वाहतुकीचे नियम न पाळता मनमानी करून जे रिक्षाचालक सतत वाहतुकीचे नियम मोडतात. बेशिस्तीने प्रवासी वाहतूक करतात. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत आहे. जे चालक सतत नियमभंग करीत असल्याचे तपासणीत आढळून आले तर त्यांचा रिक्षा परवाना कायमचा निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Action on indiscipline rickshaw driver at thane