लोकसत्ता प्रतिनिधी

ठाणे : धुलिवंदन आणि होळी निमित्ताने ठाणे वाहतुक पोलिसांनी मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारला. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात वाहतुक पोलिसांनी ८९ मद्यपी वाहन चालकांविरोधात कारवाई केली. तर विना शिरस्त्राण वाहन चालविणाऱ्या ४१३ आणि दुचाकीवर दोघांपेक्षा अधिक जणांनी प्रवास केल्याप्रकरणी २१४ जणांविरोधात कारवाई करण्यात आली.

ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि भिवंडी शहरांचा भाग येतो. ठाणे आयुक्तालय क्षेत्रात ठाणे वाहतुक पोलिसांनी ठिकठिकाणी बंदोबस्त नेमला होता. या कारवाईत पोलिसांनी श्वास विश्लेषक यंत्राद्वारे होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण ८९ मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली. तसेच मद्यपी वाहन चालकांसोबत प्रवास करणाऱ्या दोन प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. ठाणे, उल्हासनगर, अंरबनाथ आणि बदलापूर भागात सर्वाधिक मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.

होळी आणि धुलिवंदनाच्या दिवशी अनेकजण दुचाकीवरुन विना शिरस्त्राण दुचाकी चालवित होते. तर काही दुचाकींवर तीन जण किंवा त्यापेक्षा अधिकजण प्रवास करत होते. त्यामुळे विना शिरस्त्राण प्रवास करणाऱ्या ४१३ जणांविरोधात तर दुचाकीवर तीन किंवा त्यापेक्षा जास्तजणांनी प्रवास केल्याप्रकरणी २७४ जणांविरोधात कारवाई झाली आहे.

मद्यपींवरील कारवाई

ठाणे ते दिवा – २७
भिवंडी – २०
डोंबिवली ते कल्याण – १८
उल्हासनगर ते बदलापूर – २४
एकूण – ८९