डोंबिवली – भाजपचे कल्याण जिल्हा ग्रामीण उपाध्यक्ष संदीप माळी यांच्यावर ठाणे पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून मानपाडा पोलिसांनी बुधवारी रात्री ठाणे जिल्ह्यातून तडीपारची कारवाई केली. निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील भाजपमधील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

संदीप माळी यांचे २७ गावांमधील भोपर परिसरात वर्चस्व आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत माळी हे कल्याण ग्रामीणमधील मनसेचे उमेदवार राजू पाटील यांचे काम करत असल्याच्या तक्रारी महायुतीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी आपल्या वरिष्ठांकडे केल्या होत्या. कल्याण ग्रामीणमध्ये राजेश मोरे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. राजेश मोरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे खास समर्थक मानले जातात. त्यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना-भाजपने ग्रामीणमध्ये जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा – ठाणे : महिलेला ढकलून मंगळसूत्र चोरणारा अटकेत

मोरे यांना शिंदे शिवसेनेने कल्याण ग्रामीणमध्ये उमेदवारी दिल्याने मनसेचे उमेदवार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली होती. त्यामुळे शिंदे शिवसेना आणि मनसे यांच्यात कल्याण ग्रामीणमध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे.

या सगळ्या पार्श्वभूमीवर संदीप माळी मनसेचे राजू पाटील यांचे काम करत असल्याच्या तक्रारी वाढल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. अशाच प्रकारे तीन महिन्यांपूर्वी डोंबिवलीमध्ये महायुतीमधील एका ज्येष्ठ नगरसेवकाने बंडखोर माजी नगरसेवकाचे समर्थन सुरू करताच त्यांनाही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती. नंतर हे प्रकरण थंडावले.

या कारवाईबद्दल भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशाच प्रकारची कारवाई पोलिसांच्या अभिलेखावरील राजकीय मंडळींवर कारवाई करण्याची मागणी नाराज कार्यकर्ते करत आहेत.

हेही वाचा – सुभाष पवार जायंट किलर ठरणार, सुप्रिया सुळे यांचा दावा, बदलापुरात सभेत भाजपावर टीका

मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. मनसेचे राजू पाटील हे माझे वैयक्तिक मित्र आणि नातेवाईक आहेत. लोकसभा निवडणुकीच्या वेळी महायुतीचा धर्म म्हणून शिवसेना-भाजप व मनसेने एकत्रितपणे काम केले. आता विधानसभा निवडणूकच्या तोंडावर त्या कामाचे फळ म्हणून मला पोलिसांकडून तडीपारची नोटीस देण्यात आली आहे. आगरी समाजाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी आता सावध राहावे. महायुती धर्म पाळला म्हणून ही वेळ माझ्यावर आली. ती वेळ उद्या तुमच्यावर येऊ शकते, अशी प्रतिक्रिया भाजपचे संदीप माळी यांनी दिली आहे.

Story img Loader