ठाणे : ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात ठाणे वाहतूक नियंत्रण शाखेने बडगा उगारला आहे. अवघ्या आठ दिवसांत वाहतूक पोलिसांनी १,९७२ रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली. सर्वाधिक कारवाई ही रिक्षा थांबा सोडून उभे राहणाऱ्या, गणवेश नसलेल्या आणि बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांविरोधात करण्यात आली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकातून दिवसाला सुमारे पाच लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे स्थानक परिसरात रिक्षा थांबाही सुरू करण्यात आला आहे. या थांब्यामधून रांगेत प्रवासी घेणे रिक्षाचालकांना बंधनकारक असतानाही लवकर प्रवासी भाडे मिळावे आणि नव्याने ठाणे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांना हेरून त्यांच्याकडून जादा प्रवासी भाडे आकारता यावे या उद्देशातून काही रिक्षाचालक थांबा सोडून इतरत्र रिक्षा उभी करत होते. या संदर्भाच्या तक्रारी प्रवाशांकडून वाहतूक पोलिसांकडे येत होत्या. अनेक रिक्षाचालकांकडे परवानाही नसतो. तर काही रिक्षाचालक पांढऱ्या गणवेशाविना उभे असतात. या रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे प्रवासी हैराण झाले होते.

स्थानक परिसरात रिक्षाचालकांच्या या बेशिस्त पद्धतीला आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी लोहमार्ग, रेल्वे सुरक्षा दल, ठाणे नगर पोलीस आणि परिवहन विभाग यांच्या मदतीने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अवघ्या आठ दिवसांत वाहतूक पोलिसांनी स्थानकाच्या पश्चिमेकडील १,९७२ रिक्षाचालकांविरोधात कारवाई केली आहे. या रिक्षाचालकांविरोधात ४ लाख २१ हजार २०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सर्वाधिक कारवाई ही बेशिस्त पद्धतीने रिक्षा उभ्या करणाऱ्या, गणवेश नसणे, थांबा सोडून रिक्षा उभ्या करणे, बॅज नसणाऱ्या रिक्षाचालकांविरोधात करण्यात आली आहे. या कारवायांमुळे गेल्या काही दिवसांपासून रिक्षाचालकांच्या मुजोरीला लगाम लागत असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.