डोंबिवली रेल्वे स्थानक भागातील वर्दळीच्या रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहन मालकांच्या विरुध्द डोंबिवली वाहतूक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातून डोंबिवलीत येणारे अनेक वाहन चालक आपली वाहने डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक भागातील ना प्रवेश मार्गिकेत उभी करुन वाहतूक कोंडी करत आहेत. या वाहनांमुळे फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, नेहरु रस्ता, पाटकर रस्ता, इंदिरा चौक, केळकर रस्ता भागात वाहतूक कोंडी होत आहे. अशा घुसखोर वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे.

वाहतूक कोंडीला अडथळा करणे, मोटार वाहन कायद्याचा भंग करणे अशा कलमान्वये वाहन मालकांकडून ऑनलाईन प्रणालीतून दंड वसूल करण्यात येत आहे. या कारवाईमुळे डोंबिवलीतील स्थानिक वाहन चालक आता रेल्वे स्थानक भागात वाहने उभी करणे टाळत आहेत. डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसर हा सर्वाधिक वर्दळीचा भाग आहे. ठाणे, नवी मुंबई, पनवेल, अंबरनाथ, बदलापूर परिसरातील औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांमधील कामगार, अधिकारी वर्ग कंपनी बसमधून डोंबिवली पूर्व भागात उतरतो. ओला, उबर चालक प्रवासी वाहतूक करण्यासाठी स्थानक भागात येतात. याशिवाय रिक्षा, खासगी वाहने यांचा स्थानक भागात सतत राबता असतो. त्यामुळे डोंबिवली पूर्व भागातील रस्ते सतत वाहन वर्दळीने भरलेले असतात. त्यात एखाद्या वाहन चालकाने सर्वाधिक वर्दळीच्या बाजीप्रभू चौक, चिमणी गल्ली, फडके रस्ता, नेहरु रस्ता, डाॅ. राॅथ रस्ता, केळकर रस्ता, इंदिरा चौक, पी. पी. चेंबर्स भागात रस्त्याच्या कडेला वाहन उभे केले तर काही क्षणात या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. या कोंडीचा अनुभव गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील नागरिक घेत आहेत.

फडके रस्त्यावर हाॅटेलच्या समोर अनेक घरपोच सेवा देणारे कर्मचारी तीन ते चार रांगांमध्ये दुचाकी घेऊन अस्ताव्यस्त उभे असतात. या वाहन चालकांनी रस्ता सोडून बाजुच्या गल्लीत उभे राहावे किंवा वाहतुकीला अडथळा होईल अशा पध्दतीने रस्त्यावर दुचाकी उभ्या करू नयेत म्हणून हाॅटेल मालकांनी सूचना करावी. किंवा वाहतूक विभागाने अशा बेशिस्त दुचाकी स्वारांवर कारवाई करावी, अशी मागणी पादचाऱ्यांकडून केली जात आहे.
दररोज संध्याकाळी सात वाजता वाहतूक विभागाने फडके रस्त्यावर दोन वाहतूक पोलीस उभे करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. के. बी. विरा शाळेच्या गल्लीतून येणारे अनेक वाहन चालक नेहरु रस्त्यावर जाण्यासाठी मध्येच घुसतात, त्याचवेळी फडके रस्त्यावरुन कंपनी कामगार बस, केडीएमटीच्या बस, खासगी बस धावत असतात. याशिवाय डोंबिवली परिसरातील गृहसंकुलांच्या खासगी बस रेल्वे स्थानक भागातून प्रवासी वाहतूक करतात. या वाहनांचा भार एकावेळी फडके रस्त्यावर येत असल्याने फडके रस्ता, बाजीप्रभू चौक, इंदिरा चौकात नियमित कोंडी होते, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत.

मानपाडा रस्त्याने येणारे दुचाकी, मोटार चालक केळकर रस्ता, फडके रस्त्याने जाण्यास प्रवेश बंदी असताना तेथील मार्गिकेत घुसून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत. एका दिशा मार्गिकांचा डोंबिवलीत फज्जा उडाला आहे.

वाहतूक विभागाकडील अपुरे मनुष्यबळ आणि वाढती वाहन संख्या, चौक, नाके यामुळे वाहतूक नियोजन करताना पोलिसांची तारांबळ उडत आहे.
डोंबिवली रेल्वे स्थानक भागात एक दिशा मार्गिकांचा भंग करुन वाहन चालविणारे, रस्त्यावर नियमबाह्य वाहन उभे करुन इतर वाहनांना अडथळा करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई केली जाते. रेल्वे स्थानक भागातील मुख्य सर्व रस्त्यांवर वाहतूक पोलीस, सेवक तैनात असतात. लवकरच टोईंग व्हॅन सुरू होईल. त्यामुळे नियमबाह्य उभ्या वाहनांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. – उमेश गित्ते , पोलीस निरीक्षक ,वाहतूक विभाग, डोंबिवली