उल्हासनगरः प्रदुषणाच्या विळख्यात सापडलेल्या उल्हास नदीच्या पुनरूज्जीवनासाठी एकीकडे प्रयत्न होत असतानाच दुसरीकडे नदीच्या पात्राशेजारीत घाट बांधून कॉंक्रिटीकरण केल्याचा आरोप करत उल्हासनगरच्या हिराली फाऊंडेशनच्या वतीने पाटबंधारे विभागाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीवर उत्तर देताना पाटबंधारे विभागाने उल्हासनगर महापालिकेला संबंधित बांधकामावर नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे भाजप आमदार कुमार आयलानी यांचा हा घाट प्रकल्प वादात सापडला आहे.
उल्हासनगर महापालिका क्षेत्रातून उल्हास नदी वाहते. याच नदीच्या किनारी अनेक मोठमोठे गृहप्रकल्प उभारण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी पुराचे पाणी साठण्याच्या या जागा आता गृहसंकुलांनी व्यापल्या आहेत. यात भागाच एंटिलिया हा मोठा गृहप्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या शेजारून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पात्राशेजारी स्थानिक भाजप आमदार कुमार आयलानी यांच्या प्रयत्नाने विसर्जन घाटाचे काम सुरू होते. सुशोभीकरण, घाट निर्मिती, पर्यटन स्थळ अशा प्रकारचे हे काम होते. मात्र या कामाच्या निमित्ताने ७० वर्षांपेक्षा जुनी झाडे तोडली गेली. तसेच नदी पात्रात, नदीच्या किनारी बांधकाम आणि कॉंक्रिटीकरण केले गेले, असा आरोप स्थानिक पर्यावरण कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांनी केला. त्यांच्या हिराली फाऊंडेशनच्या वतीने या विरूद्ध गेल्या दीड वर्षांपासून विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये तक्रार देण्यात आली होती.
वर्षभरापूर्वी उल्हासनगरच्या उपविभागीय कार्यालयाने याप्रकरणी तपासणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश उल्हासनगर महापालिका प्रशासनाला दिले होते. मात्र त्यानंतरही याप्रकरणी कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आपण पाटबंधारे विभागाच्या ठाणे कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाने उल्हासनगर महापालिकेला त्या बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिल्याची माहिती सरिता खानचंदानी यांनी दिली आहे. त्यामुळे उल्हासनगर महापालिकेने त्यावर कारवाई करण्याची गरज आहे, असेही खानचंदानी यांनी सांगितले आहे. याबाबत उल्हासनगर महापालिकेच्या आयुक्त मनिषा आव्हाळे यांना संपर्क केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
सर्व काम कायदेशीर
माझ्या आमदार निधीतून, पर्यटन स्थळ विकास निधीतून तसेच नगरविकास विभागाच्या निधीतून या घाट प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व परवानग्या घेतल्या आहेत. त्यामुळे काम बेकायदेशीर असण्याचा प्रश्नच येत नाही. येथे विसर्जन घाट आणि फेरफटका मारण्यासाठी जागा तयार करण्याचा आमचा मानस आहे, अशी प्रतिक्रिया उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांनी लोकसत्ताशी बोलताना दिली.
प्रतिक्रिया: इंद्रायणी नदीतील बंगले तोडण्याचा निकाल आता आपल्यासमोर स्पष्ट आहे. इथे नदीपात्रात पायऱ्या बनवल्या असून नदी किनारी काँक्रीटीकरण केले आहे. तिथे अनेक झाडे होती ती कापलेली आहेत. स्थानिक आमदांनी केलेल्या तीन वर्षांपूर्वीच्या पाहणीवेळी त्यांच्याच छायाचित्रांमध्ये झाडे दिसत आहेत. परवानगी असेल तर ती दाखवावी. कुणी परवानगी दिली हे आम्हालाही जाणून घ्यायचे आहे. – सरिता खानचंदानी, हिराली फाऊंडेशन.