कल्याण : शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांनो, आम्ही व्यासपीठावर एकत्र बसलो आहोत. विकासकामांचे नारळ एकत्र फोडतोय. मग तुम्ही कार्यकर्ते व्यासपीठाच्या खालून बेंबीच्या देठापासून कशासाठी पक्षीय घोषणा देता. जरा शांततेने घ्याल तर बरे होईल. कोंबडं झाकलं म्हणून उगवायचं राहत नाही. तेव्हा घोषणा जरूर द्या, पण विकासाचे कोंबडे कसे उगवेल याकडे प्राधान्याने लक्ष द्या, अशा कानपिचक्या देत केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी शिवसेना-भाजपच्या कार्यकर्त्यांची भंबेरी उडवली.
कल्याण पश्चिमेत रौनक सिटी गृहसंकुल परिसरात स्मार्ट रोडचे उद्घाटन केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, खा. डॉक्टर श्रीकांत शिंदे, आ. गणपत गायकवाड, आ. विश्वनाथ भोईर, आ. बालाजी किणीकर, माजी महापौर विनीता राणे, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमात शिवसैनिकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत घोषणाबाजी केली.
खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा जयघोष करत शिवसैनिकांनी भाजपवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न चालविला होता. भाजपचे कार्यकर्तेही कपिल पाटील यांच्या नावाने घोषणा देत होते. बराच वेळ ही घोषणाबाजी चढाओढीने सुरू होती. काही केल्या हे शक्तिप्रदर्शन आटोपत नाही हे पाहून मंत्री पाटील यांनी ध्वनिक्षेपकाचा ताबा घेतला आणि सेना, भाजपच्या कार्यकर्त्यांना जिव्हारी लागतील अशा कानपिचक्या दिल्या.
कल्याण डोंबिवलीत स्मार्ट सिटीची कामे केंद्र, राज्य आणि पालिकेच्या हिश्शातून सुरू आहेत. विकासकामांमध्ये प्रत्येक सरकारचा हिस्सा आहे.
व्यासपीठावर शिवसेना-भाजप भेदाभेद न करता आम्ही एकत्र, खुर्चीला खुर्ची लावून बसलो आहोत. मग, कार्यक्रमात चढाओढीच्या घोषणा कशासाठी? कोंबडं झाकून ठेवले म्हणून उगवायचं राहत नाही. सूर्य उगवला पाहिजे. कोणाच्या तरी पुढाकाराने, प्रयत्नाने कामे होत आहेत ना याकडे लक्ष ठेवा आणि विकासकामांनी आपले शहर, परिसर सुशोभित होईल याकडे लक्ष द्या, अशा कानपिचक्या केंद्रीय मंत्री पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.
कल्याण-डोंबिवलीला एक हजार कोटींचा निधी
यापूर्वी कधी मिळाला नाही असा एक हजार कोटींचा निधी दोन वर्षांत कल्याण, डोंबिवलीला मिळाला. आता बँक आपल्या ताब्यात आहे. निधीत कमतरता नाही. पक्षीय भेद न करता पालकमंत्री शिंदे निधीचे वाटप करतात. सर्व भागांचा शाश्वत विकास होत आहे, असे खा. शिंदे यांनी कल्याण पूर्वेत डॉ. आंबेडकर स्मारक भूमिपूजन सोहळय़ात सांगितले. तसेच, बाबासाहेबांच्या स्मारकासाठी कसा निधी आणला हे तारीखवार सांगितले. त्याला उत्तर देताना मंत्री पाटील म्हणाले, बँकेतून कर्ज घेताना अगोदर पाच ते १० टक्के भरणा करावा लागतो. फडणवीस मुख्यमंत्री असताना स्मारकासाठी गणपत गायकवाड यांनी ५० लाख मंजूर करून घेतले. ते शासन तिजोरीत आहेत. या ठेव रकमेवर तुम्हाला आताचा निधी मिळाला आहे, असे सांगून खासदार, पालकमंत्री यांना कोपरखळी मारली. आ. गायकवाड यांनी मात्र स्मारकाचे श्रेय खासदारांनाच दिले. खासदारांच्या प्रयत्नाने स्मारक मार्गी लागले. त्यामुळे खासदारांनी तारीखवार स्मारक पाठपुराव्याची जंत्री वाचली नसती तरी चालली असती, असे मंत्री पाटील म्हणाले आणि उपस्थितांमध्ये खसखस पिकली.
