ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिला शनिवारी ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. केतकी हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. केतकीने फेसबुकवर शरद पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला. या मजकुराखाली वकील नितीन भावे असा उल्लेख आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर केतकीवर कारवाईची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि  कार्यकर्ते करीत होते. दरम्यान, राष्ट्रवादीचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष स्वप्निल नेटके यांनी याप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे केतकीवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एककडून सुरू होता. पोलीस केतकीचा सर्वत्र शोध घेत होते. ती नवी मुंबईच्या कळंबोली भागात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला ताब्यात घेण्यात आले. नंतर तिला कळंबोली पोलीस ठाण्यात नेण्यात आले. रात्री उशिरा तिचा ताबा ठाणे पोलिसांनी घेतला. तिला अटक केल्याची माहिती युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी दिली.

कायम वादात..

केतकी चितळे हिने अनेकदा वादग्रस्त टिप्पण्या करून वाद ओढवून घेतले आहेत. नवबौद्धांसंदर्भातील टिप्पणीप्रकरणी तिच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल झाली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट) गुन्हाही दाखल झाला होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करून तिने वाद ओढवून घेतला होता.