ठाणे : ‘इफ्रेडीन’ या अमलीपदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णीची बँक खाती ठाणे पोलिसांनी गोठविली आहेत. तसेच तिच्या मुंबईतील दोन फ्लॅटनाही टाळे ठोकले. गोठवलेली बँक खाती सुरू करण्यासाठी तसेच फ्लॅटचा ताबा पुन्हा घेण्यासाठी ममता कुलकर्णीने वकिलांमार्फत ठाणे न्यायालयात अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने अर्जातील मागणी फेटाळली आहे.

‘इफ्रेडीन’ पावडरच्या आंतरराष्ट्रीय तस्करीचे रॅकेट २०१६ मध्ये ठाणे पोलिसांनी उघड केले होते. दोन हजार कोटी रुपयांच्या या रॅकेटमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णी आणि तिचा पती विकी गोस्वामी यांचा सहभाग आढळला होता. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. न्यायालयानेही त्यांना फरार घोषित केले आहे. त्यामुळे पोलिसांनी त्यांची संपत्ती आणि बँक खाते गोठविले आहे. गोठविलेली सहा बँक खाती, तीन मुदत ठेवी पुन्हा सुरू करण्यासाठी तसेच मुंबई येथील दोन फ्लॅटचा ताबा पुन्हा मिळावा यासाठी ममता कुलकर्णी हिने ठाणे न्यायालयात वकिलांमार्फत महिन्याभरापूर्वी अर्ज केला होता. ‘मला या प्रकरणात गोवण्यात आलेले आहे. घरामध्ये मी एकटी कमावती असून माझी बहीण पनवेल येथील मनोरुग्णालयात आठ वर्षांपासून उपचार घेत आहे. मात्र बँक खाती गोठविल्याने तिच्यावर उपचारासाठी खर्च करता येणे कठीण झाले आहे’, असे या अर्जात म्हटले आहे. या अर्जावरील सुनावणी ठाणे न्यायालयात झाली. सरकारी वकिलांकडून वकील शिशिर हिरे यांनी बाजू मांडली. आरोपी अद्यापही न्यायालय आणि तपास यंत्रणांसमोर हजर झालेले नाहीत. त्यामुळेच त्यांची बँक खाती गोठविली आहेत. गोठवलेली बँक खाती पुन्हा सुरू झाल्यास आरोपी गंभीर कृत्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही तसेच आरोपी कधीही पोलिसांसमोर हजर होऊ शकत नाही, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. त्यानंतर न्यायाधीशांनी अर्जातील मागणी फेटाळली.