वसईतल्या श्रद्धानंद वृद्धाश्रमाला अभिनेत्री सुलोचना यांची भेट; खरे चाहते मिळाल्याची भावना
गेल्या अनेक वर्षांपासून स्वकीयांच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसणाऱ्या वसईच्या श्रद्धानंद वृद्धाश्रमातील वृद्ध आज्यांना आपली मोठी बहीण आणि जिवाभावाची सखी भेटली आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे आणि समाधानाचे भाव उमटले. ही सखी दुसरी तिसरी कुणी नसून गतकाळातील अभिनेत्री सुलोचना दीदी होत्या. सुलोचना दीदी यांनी या वृद्धाश्रमाला भेट दिली आणि प्रेम, जिव्हाळ्याचे नाजूक क्षण उलगडत गेले.
पारनाका येथे श्रद्धानंद हा निराधार महिलांचा वृद्धाश्रम आहे. मंगळवारची संध्याकाळ येथील आज्यांसाठी खास ठरली होती. त्यांना भेटायला चक्क सुलोचना दीदी आपल्या कुटुंबीयांमसेवत आल्या होत्या. तरुण वयात ज्यांचे चित्रपट पाहिले, त्या सुलोचना दीदी आप प्रत्यक्ष भेटायला आल्यामुळे वृद्धाश्रमातील महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. सुलोचना दीदींना काय विचारू आणि काय नको असे त्यांना झाले होते. दीदींच्या भोवती गराडा घालून वृद्धाश्रमातील महिलांनी गप्पा मारायला सुरुवात केली. कुणी माहेरून मोठी बहीण, जुनी मैत्रीण आल्याचा आनंद त्यांना होत होता. दीदींच्या अभिनयाविषयी, त्यांच्या चित्रपटांविषयी आणि त्यांच्या कुटुंबाविषयी चर्चा झाली. ‘जिजाऊ’ चित्रपटातील त्यांच्या अभिनयाचे कौतुक साऱ्यांनी केले. विशेष म्हणजे सुलोचना दीदीही न कंटाळता, न थकता या आजीबाईंच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे देत होत्या. महिलांकडून मिळालेले प्रेम आणि आपुलकी पाहून दीदी गहिवरून गेल्या. माझे खरे चाहते मला या वृद्धाश्रमात मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
१०० चित्रपटांची नावे
श्रद्धानंद वृद्धाश्रमात एका आजीबाईंनी सुलोचना दीदींनी अभिनय केलेल्या १०० चित्रपटांची नावे एका कागदावर लिहून दाखवली. हे पाहून दीदी अवाक आणि भावुक झाल्या. आजही माझे चाहते आहेत, याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होते.




‘वृद्धाश्रमाने प्रेम दिले’
वृद्धाश्रमात काही अडचणी येतात का, असे दीदींनी विचारल्यावर जे प्रेम आम्हाला आमच्या कुटुंबीयांनी दिले नाही, ते इथे मिळाले असे उत्तर मिळताच सर्वाच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. वृद्धाश्रमात या महिलांना मिळणारे प्रेम पाहून दीदींनी समाधान व्यक्त केले. महिलांनी दीदींसाठी खास खाऊ तयार केला होता. दीदींच्या आठवणीसाठी त्यांच्या हस्ते आवारात गुलमोहोराचे रोप लावण्यात आले.
‘‘माझ्या येण्यामुळे तुम्हाला जो आनंद झाला, जे हसू तुमच्या चेहऱ्यावर झळकले, तो क्षण माझ्या जीवनातील सर्वात मोठा क्षण आहे. तुमचे हे प्रेम बघून माझे खरे चाहते मला आज या वृद्धाश्रमात मिळाले,’’ असे उद्गार सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांनी वृद्धाश्रमातील महिलांना दिलेल्या भेटी दरम्यान काढले.
– सुलोचना दीदी.