scorecardresearch

शहापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई

सुमारे एक कोटींची पाणीयोजना गेगाव नदीचे पाणी आटल्याने बंद स्थितीत आहे.

शहापूरमध्ये तीव्र पाणीटंचाई
२०० लिटर पाणी मिळविण्यासाठी त्यांना तब्बल १३० रुपये खर्च येत आहे.

२०० लिटर पाण्यासाठी १३० रुपये; रणरणत्या उन्हात पायपीट

शहापूर तालुक्यातील अनेक गावे आणि पाडय़ांवर सध्या तीव्र पाणीटंचाई असून एक दिवसाआड होणारा पाणीपुरवठा अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे रणरणत्या उन्हात त्यांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागत आहे. २०० लिटर पाणी मिळविण्यासाठी त्यांना तब्बल १३० रुपये खर्च येत आहे.

तालुक्यातील शिरोळ, बलवंडी, आंब्याचा पाडा, कोथळे, बिवळवाडी, विहिगाव, पूणधे आदी बोटावर मोजण्याइतके गावपाडे सोडले तर उर्वरित टंचाईग्रस्त गावपाडय़ांना सध्या एक दिवसाआड टँकर सुरू आहेत. सध्या शहापूर तालुक्यातील १०७  गावपाडय़ांसाठी अवघ्या १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील गेगाव व परिसरातील पाडय़ांवर टँकर सुरू असूनही ग्रामस्थांना तब्बल दोन किलोमीटरवरील आस्नोली येथे जाऊन पायपीट करावी लागत आहे. तसेच बैलगाडीने, मोटारसायकलवर पाण्यासाठी फेऱ्या माराव्या लागत आहेत. विशेष म्हणजे त्यासाठी पैसे मोजावे लागत असून दररोज टँकरने पाणीपुरवठा करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

सुमारे एक कोटींची पाणीयोजना गेगाव नदीचे पाणी आटल्याने बंद स्थितीत आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून गेगाव व परिसरातील पाडय़ांवर भीषण पाणीटंचाई आहे. तालुक्यातील गेगाव, नांदवळ, गायरान पाडा, मानपाडा, मोटेपाडा आदी गावपाडय़ांसाठी १५ दिवसांपासून टँकरद्वारे एक दिवसाआड पाणीपुरवठा होत असून त्यांची तहान भागात नसल्याने त्यांना तब्बल दोन किलोमीटर लांब आस्नोली येथील कूपनलिकेवरून पाणी विकत आणावे लागत आहे. २०० लिटर पाणी वाहून आणण्यासाठी बैलगाडीला १०० रुपये व पाण्याचे ३० रुपये असे १३० रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, गायरान पाडय़ावरील कूपनलिकेच्या पाण्याने ग्रामस्थांच्या घशाला त्रास होत असून ते पाणी दूषित असल्याने ‘त्या’ पाण्याची तपासणी करावी, अशी मागणी हुकमाळी यांनी शहापूर पंचायत समिती कडे केली आहे.

गावपाडय़ांवरील जनावरांचेही पाण्यावाचून हाल होत आहेत. एक किलोमीटर लांब असलेल्या विहिरीवरील दूषित पाणी जनावरांना प्यायला द्यावे लागत आहे. जनावरांना घेऊन जाणे पाणी ओढून त्यांना प्यायला देणे असा दिनक्रम तेथील ग्रामस्थांचा सुरू आहे. त्या पाण्याला दरुगधी येत असल्याने ग्रामस्थ त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करीत नसल्याचे विठ्ठल डोंगरे यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-05-2017 at 03:54 IST

संबंधित बातम्या