ठाणे : गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या ठाणे अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाला नागरिकांकडून विविध स्तरांवर विरोध होत असताना आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे या प्रकल्पाबाबत नागरिकांशी संवाद साधणार आहेत. तसेच बाळकुम येथे प्रस्तावित असलेल्या अॅमेझॉन हायपरस्केल डेटा सेंटरबाबतही ते नागरिकांची मते जाणून घेणार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ठाणे शहरातील अंतर्गत मार्गांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी ठाणे महापालिका आणि महामेट्रोच्या माध्यमातून अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मात्र, या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच खारफुटी क्षेत्रावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मेट्रोच्या बांधकामादरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही परिणाम होऊन कोंडी वाढण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या विविध मुद्द्यांवरून प्रकल्पाला विरोध वाढत आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे मंगळवारी बाळकुम येथे येणार असून, अंतर्गत वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पाबाबत नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि आक्षेप जाणून घेणार आहेत. प्रकल्पाचे नियोजन, पायाभूत सुविधांवर होणारा परिणाम आणि वाहतूक व्यवस्थेबाबतही ते माहिती घेणार आहेत.
दरम्यान, बाळकुम येथे प्रस्तावित असलेल्या अॅमेझॉन हायपरस्केल डेटा सेंटरच्या मुद्द्यावरही आदित्य ठाकरे नागरिकांशी चर्चा करणार आहेत. या प्रकल्पामुळे परिसरातील पाणी, वीज, वाहतूक, पर्यावरण तसेच इतर पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे नागरिकांच्या भूमिका आणि समस्या जाणून घेणार आहेत.
मंगळवारी सायंकाळी पाच वाजता आदित्य ठाकरे बाळकुम येथे पोहोचणार असून, संबंधित प्रकल्पांबाबत माहिती घेतल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांबाबत आदित्य ठाकरे कोणती भूमिका मांडतात, याकडे ठाणेकरांचे लक्ष लागले आहे.
