विरोधकांचे लक्ष्य ठरलेल्या शिवसेनेची खेळी; चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी
ठाणे : कोटय़वधी रुपयांचा खर्च करूनही दैना उडालेल्या ठाणे शहरातील दोन महत्त्वाकांक्षी उद्यान प्रकल्पांमधील घोटाळय़ाचे भूत निवडणुकांच्या तोंडावर मानगुटीवर बसू लागल्याने सत्ताधारी शिवसेनेने या संदर्भात आता स्वत:च आक्रमक पवित्रा घेतला आहे. या प्रकल्पांबद्दल आग्रही राहिलेले स्थानिक शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी या कथित गैरव्यवहारांचे खापर पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या माथी फोडले आहे. ठेकेदाराने या उद्यानांची योग्य कामे केली नसतानाही महापालिकेच्या अधिकाऱ्याने ठेकेदारांना खोटी आणि चुकीची बिले अदा केल्याचा आरोप करत या प्रकरणाचा चौकशी अहवाल जाहीर करण्याची मागणी महापौर आणि आयुक्तांकडे केली आहे.
ठाणे महापालिकेने घोडबंदर रोड येथे नवे ठाणे – जुने ठाणे हे थीम पार्क आणि वर्तकनगर भागात बॉलीवूड पार्क उभे केले आहे. या कामासाठी सल्लागार म्हणून कला दिग्दर्शक नितीन देसाई यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर हे काम देसाई यांच्याच कंपन्यांना बहाल करण्यात आल्याचा आरोप भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दोन वर्षांपूर्वी केला होता. निविदेतील अटीनुसार काम झाले नसतानाही महापालिकेने त्याकडे डोळेझाक करत १६ कोटी रुपयांचे बिल ठेकेदाराला अदा केल्याचे प्रकरण गाजले होते. या वादाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने चौकशी समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल अद्याप उघड झालेला नाही.
या कामासाठी अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असताना प्रत्यक्षात ८२ टक्क्यांपेक्षा अधिक रकमेची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप मध्यंतरी भाजपचे स्थानिक आमदार संजय केळकर यानी केला होता. निवडणुकांच्या तोंडावर या दोन्ही मोठय़ा उद्यानांच्या घोटाळय़ाची मालिका पुन्हा एकदा भाजप तसेच विरोधकांनी चर्चेत आणत सत्ताधारी शिवसेनेला टीकेचे लक्ष्य केले असताना आमदार सरनाईक यांनी मात्र ही चूक अधिकाऱ्यांचीच असा पवित्रा घेत या प्रकरणातील चौकशी अहवाल जाहीर करा असे पत्र महापौर नरेश म्हस्के आणि आयुक्त डॉ.विपीन शर्मा यांना दिले आहे.
सरनाईकांच्या पत्रात घोटाळय़ाची कबुली?
प्रताप सरनाईक यांनी पालिका आयुक्त आणि महापौर यांना पाठवलेल्या पत्रात या ‘थीम पार्क’मध्ये गैरव्यवहार झाल्याची अप्रत्यक्ष कबुलीच दिली आहे. या प्रकल्पांच्या कामाविषयी आपल्यासह अनेक राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी तक्रारी केल्या आहेत, असे सरनाईक यांनी म्हटले आहे. या जागेवर योग्य आणि नियमाप्रमाणे पूर्ण काम केलेले नसतानाही ठेकेदाराने खोटी आणि चुकीची बिले दिली. ती अदाही करण्यात आली. त्यामुळे या दोन्ही थीम पार्कची दुर्दशा झालेली आहे, असा आरोप करत सरनाईक यांच्या पत्रात या कामात घोटाळय़ाची एकप्रकारे कबुली दिल्याची चर्चा आहे. घोडबंदर रोडवरील जुने ठाणे, नवीन ठाणे व रूणवाल प्लाझाजवळील बॉलीवूड थीम पार्कच्या कामामध्ये ठेकेदार आणि महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे शिवसेनेवर विरोधकांकडून आरोप होत आहेत, असे सरनाईक म्हणाले. तसेच चौकशी अहवाल अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जाहीर न झाल्यास या मुद्दय़ावर विधिमंडळ अधिवेशनात चर्चा घडवून आणण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.