बदलापुरातून जाणाऱ्या कर्जत महामार्गावरील दुभाजकांवर लावलेल्या जाहिराती आता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असल्याने अनेक अपघात होत असल्याचे समोर आले आहे.

बदलापूर पूर्वेतून जाणाऱ्या अंबरनाथ-बदलापूर महामार्गावर चिखलोली झिरो पॉइंट ते खरवईपर्यंत दुभाजकावर आणि चार ठिकाणी मोठय़ा जाहिराती लावण्यासाठी विजय अ‍ॅडव्हर्टाइज कंपनीला कंत्राट देण्यात आले आहे. त्यांनी चिखलोली ते खरवईदरम्यान दुभाजकावर अडीच फूट रुंद आणि सहा फूट उंचीचे जाहिरात फलक लावणे अपेक्षित आहे, तसेच यांची संख्याही शंभर असावी, असेही वाहतूक विभागाचे साहाय्यक आयुक्त बाबाजी आव्हाड यांनी दिलेल्या ना हरकत दाखल्यात म्हटले आहे.

यासह दोन जाहिरात फलकात किमान शंभर फुटांचे अंतर असावे. दुभाजकापासून दोन फुटांवर ही जाहिरात असावी असेही नमूद करण्यात आले आहे. मात्र यातील दोन जाहिरातीतील अंतर राखणे असो वा उंचीचे नियम कंत्राटदाराने पाळलेले नाहीत. दोन जाहिरातींमधील अंतर कमी असल्याने उजव्या मार्गिकेचे वाहन डाव्या मार्गिकेमध्ये प्रवेश करीत असताना तात्काळ दृष्टीस पडत नाही. त्यामुळे दुचाकी आणि इतर वाहनांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. अचानक समोर आलेल्या वाहनांमुळे दुचाकीस्वारांचा तोल जाऊन ते पडण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

१५ दिवसांपूर्वी पूर्वेत राहणाऱ्या शशांक नायकवडी या तरुणाचा दुचाकीवरून अपघात झाला होता. त्यात तो जखमी झाला होता. रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यांनाही दुभाजकाशेजारी उभे राहिल्यानंतर वाहने पाहण्यात अडथळे येतात. त्यामुळे जीव मुठीत धरून पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपकार्यकारी अभियंते चंद्रकांत भगत यांनी अशा जाहिराती काढण्यात येईल, असे सांगितले.